मुंबई : कुर्ला मदर डेअरीची जागा अखेर धारावी पुनर्वसनासाठी अदानी समुहाला देण्याच्या विरोधात खासदार वर्षा गायवाड यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी कुर्ला परिसरात निषेध मार्चा काढला. अभ्युदय बँक चौकापासून मदर डेअरच्या जागेपर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळं मुख्य चौकातच निदर्शनं करून हे आंदोलन आटोपते घेण्यात आलं.
वर्षा गयकवाड यांचा राज्य सरकारवर घणाघात : या आंदोलनात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड काँग्रेस कार्यकर्त्यांसह सहभागी झाल्या होत्या. मुंबई पोलिसांनी मुख्य चौकाच्या परिसरात बॅरेकेडिंग करून बंद केल्यानं मोर्चा पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळं आंदोलकांनी तिथं बसून प्रदर्शन केलं. मुंबई गिळंकृत करू पाहणाऱ्या अदानीला सर्वत्र विरोध असतानाही राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याचा आरोप यावेळी वर्षा गायकवाड यांनी केला. "धारावीकरांचं पुनर्वसन आहे. त्याच ठिकाणी होणार आहे. मग मुंबईभर अदानीला जागा देण्याचं कारणचं काय?" असा सवाल करत वर्षा गायकवाड यांनी विरोध करणाऱ्या स्थानिकांच्या पाठीशी उभं राहू, असं म्हणत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मदर डेअरीच्या जागेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब : कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कुर्ल्यातील जवळपास 8 हेक्टरची जागा धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानी समूहाला देण्यात येऊ नये, याकरता सत्ताधारी शिवसेनेचे स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, काँग्रेसच्या विद्यमान खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह स्थानिकांनी स्थापन केलेल्या समितीनंही अनेक आंदोलने, मानवी साखळ्यांद्वारे निषेध दर्शवला होता. मात्र, या विरोधाला न जुमानता महायुती सरकारनं मदर डेअरीची जागा अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेतला.
जागा देण्याचा निर्णय आधी पासूनच ठरलेला : धारावी पुनर्विकास प्रकल्पात धारावीकरांचं स्थलांतर करणं क्रमप्राप्त होतं. त्यादृष्टीनं मुंबईतील मुलुंड, देवनारप्रमाणेच कुर्ला येथील मदर डेअरीची जागाही महत्त्वाची मानली जात होती. ही जागा आपल्याला या प्रकल्पात दिली जावी, अशी मागणी अदानी समूहाकडून करण्यात आली होती. ही मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे. धारावीतील लोकांच्या स्थलांतरासाठी मदर डेअरी, देवनार डम्पिंग ग्राऊंड, मालाडसह मुलुंडमधील भूखंडाची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा -
- गायकवाडांच्या नेतृत्वात धारावीत काँग्रेसचा दबदबा कायम राहणार का? गणित समजून घ्या...
- अदानीला मुंबई आंदण देण्याची भाजपाची 'लाडका मित्र योजना' - खासदार गायकवाड - Land in Mumbai to Adani
- धारावी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीकरिता १८ जण इच्छुक, वर्षा गायकवाड यांनी काय मांडली भूमिका ? - Assembly election 2024