पिंपरी चिंचवड : पुण्यातील राजकीय पुढाऱ्याची सून असलेल्या वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या दहा महिन्यांच्या बाळाला हगवणे कुटुंबीयांनी एका अज्ञात स्थळी लपवून ठेवलं होतं. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर वैष्णवी हगवणे यांच्या माहेरच्या कुटुंबीयांना दहा महिन्यांच्या बाळाचा ताबा मिळाला आहे.
चिमुकल्याचा ताबा मिळताच कुटुंबीयांना अश्रू अनावर : वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या सासरच्या कुटुंबातील तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. वैष्णवी हगवणे यांचं बाळ अवघ्या दहा महिन्याचं असल्यानं बाळाचा ताबा नेमका कुणाला आणि कसा मिळवून द्यायचा असा पेच पोलीस विभागाला पडला होता. मात्र, या प्रकरणात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीनं लक्ष घातल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीनं बाणेर रोडवर वैष्णवी यांच्या माहेरच्या कुटुंबीयांना दहा महिन्याचं चिमुकलं बाळ आणून दिलं. वैष्णवी हगवणे यांच्या बाळाला पाहून माहेरच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
हगवणे परिवाराला पाठबळ देतोय कोण? : राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी रुपाली ठोंबरे यांनी स्वतः जातीने पुढाकार घेऊन बाळाची आणि आजी-आजोबांची भेट घडवून दिली. यावेळी रुपाली ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "हगवणे हे राजकीय नेते असले तरी, त्यांना राजकीय पाठबळ वगैरे काही नाही. मुळात राजकारणात अशा गोष्टींना पाठबळ देण्याचा संबंधच येत नाही. परंतु, या हगवणे यांचे एक मामा हे पोलीस खात्यामध्ये अधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून जर या हगवणे कुटुंबीयांना पाठबळ मिळत असेल तर? याची चौकशी नक्कीच व्हावी. हगवणे परिवाराला पाठबळ देतोय कोण? याची चौकशी करून त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. लवकरच या घटनेत जे जे सामील आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून पीडित वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत."
हेही वाचा :