बिहार निवडणुकीमुळे केंद्र सरकारचे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष, उद्धव ठाकरेंचा आरोप
उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी सरकारकडे पत्रकार परिषदेतून केली.

Published : October 1, 2025 at 7:58 PM IST
मुंबई : गुरुवारी (2 ऑक्टोबर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क इथं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगाव नेस्को सेंटर इथं होणार आहे. एका बाजूला राज्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना मुंबईत दसरा मेळावा होणार आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी न येण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं दसरा मेळावावर पैसे खर्च न करता तेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्यावेत, असं म्हणत भाजपानं टीका केली आहे. यावर आता उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरेंनी केली सरसकट कर्जमाफीची मागणी : मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंनी "शेतकऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर त्यांची कर्जमाफी करणार का?" असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. घर आणि पिकासोबतच, शेतजमीन पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं सरकारनं कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी आता शेतकरी संघटनांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील या भागाचा दौरा केला होता. दौऱ्यानंतर मराठवाड्यातील पूरस्थितीवर उद्धव ठाकरे 2 ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्यात बोलतील असं म्हटलं जात होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे.
केंद्र सरकार महाराष्ट्रसोबत दुजाभाव करतं : पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. "केंद्र सरकार महाराष्ट्रसोबत दुजाभाव करतं," असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीची हानी होऊनही अद्यापही केंद्रातील टीम दुष्काळ पाहण्यासाठी आलेली नाही. बिहारमध्ये निवडणुका असल्यानं केंद्र सरकार हा दुजाभाव करत आहे. सध्या महाराष्ट्र मोठ्या संकटाचा सामना करत आहे. मी राज्य सरकारला विनंती करतो की त्यांनी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय शेतकऱ्यांना मदत करावी," अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
देवेंद्र फडणवीस आताही तसंच करणार का? : "मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडं कोणतंही नियोजन नसल्याचं दिसून येतं. ते सर्व स्वतःच्या जाहिराती आणि ब्रँडिंगमध्ये व्यस्त आहेत. अजित पवार कोणत्याही गोष्टीचा भाग असल्याचं दिसत नाही. ते एकटे पडलेत. काही साखर कारखानदारांनी अलीकडेच कर्जबाजारी झालेल्या त्यांच्या गिरण्या वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा विमा उतरवला आहे. जर भाजपा राजकीय नेत्यांना सुरक्षा देण्यास तयार असेल तर आपल्या शेतकऱ्यांना का नाही? देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मला पत्र लिहून कोल्हापुरातील पूर बाधित शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत आणि विशेष मदत पॅकेजची मागणी केली होती. त्यावेळी मी शेती कर्जमाफीची घोषणा केली होती. मुख्यमंत्री आताही असंच करतील का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा :

