मुंबई : "सरकार येतात आणि जातात. हे सरकारही उद्या जाणार आहे. सरकारने स्वर्गा सारख्या भारत देशाचा नरक केला. त्याचा पुन्हा स्वर्ग बनवायचा असेल तर हे सरकार आपल्याला घालवावे लागेल. त्यासाठी लढणारी नवीन पिढी तयार करावी लागेल," असं सांगत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार फटकेबाजी केली. दरम्यान हुकूमशहा कोणीही असला तरी त्याला एक दिवस जावेच लागणार आहे. हिटलरने देखील गोळी मारून आत्महत्या केली होती. तुम्हाला सुध्दा एक दिवस तेच करावे लागेल, असे ठाकरे म्हणाले.
संजय राऊत यांचे नरकातला स्वर्ग हे पुस्तक प्रकाशन : संजय राऊत यांचे नरकातला स्वर्ग हे पुस्तक नवीन पिढीला प्रेरणा देणारं आहे. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन अन्यायाशी लढणारी पिढी उभी राहील, अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी दिल्या. "आयुष्याच्या प्रवासात अनेक जण भेटतात, पण त्यातील काही कायम राहतात. तर काही संधीसाधू पळून जातात. बाळासाहेबांनी हिंदू-मराठी माणसाला आत्मविश्वास, जिद्द दिली. ते आज स्वर्गातून बघत आहेत की, ज्यांना आपण दिले ते खरे किती आहेत आणि भाडखाऊ पळणारे किती आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. दुसऱयाला आनंद देता आला नाही तरी चालेल, पण त्रास तरी देऊ नका, असा टोला एकनाथ शिंदे यांना लगावला. शिवसेना अनेक लढाया लढली आहे. यापुढेही लढाव्या लागतील. राऊत यांचे पुस्तक वचाल्यानंतर लोकांच्या मनात असलेली ईडी विषयीची तुरुंगाविषयीची भीती निघून जाईल. लढण्याची प्रेरणा या पुस्तकातून लोकांना मिळेल," असे सांगताना हे हुकूमशाही सरकार घालवण्यासाठी आपल्याला लढावेच लागेल, असे ठाकरे म्हणाले.
शिवसेनेला संपविण्याचा हा पहिला प्रयत्न नाही :"शिवसेनेला संपविण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. 1969 साली सीमाप्रश्नावरून शिवसेनाप्रमुखांनाही शंभर दिवसांचा तुरुंगवास झाला होता. तेव्हा मोरारजी देसाई उपपंतप्रधान होते आणिबाणीच्या वेळी रजनी पटेल आणि आता हे. हा योगायोग आहे. कारण आम्ही मराठी माणसाचे हित जपतोय म्हणून शिवसेनेवर वरवंटा फिरवला जातोय. 1975 साली पण रजनी पटेलांनी सांगितले होते की शिवसेना काँग्रेसमध्ये विलिन करा. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते तसे केलेत तर तुमची अंत्ययात्रा निघेल. त्यामुळे हे सरकार पण जाणार, ते घालवायलाच लागेल," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान हा देशाचा असतो : ‘एक देश एक निवडणूक’ करायचे असेल तर सर्वांना समान पातळीवर आणावे लागेल. पंतप्रधान हा देशाचा असतो. त्यांनीही पंतप्रधान म्हणून कोण्या एका पक्षाचा प्रचार करू नये. निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांचे विमान जाते म्हणून इतरांची विमाने उडू दिली जात नाहीत. पंतप्रधानांच्या सभा व्हायला हव्यात इतरांच्या झाल्या नाहीत तरी चालतील हे कसे चालणार, असा सवाल त्यांनी केला.
तुमचे हिंदुत्व बुरसटलेले : "अमित शाह आम्हाला कशासाठी दुश्मन समजता? तुमचे आणि आमचे मतभेद आहेत. तुमचे हिंदुत्व बुरसटलेले हिंदुत्व आहे. आमचे राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व आहे. तुम्ही आम्हाला पाकिस्तानपेक्षा आधी संपवायचे का बघत आहात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी अमित शाह कधी मातोश्रीवर आले होते का असे कोणी विचारले तर आपण नाही आठवत असे सांगू कारण केलेले उपकार मोजायचे नसतात, ते करायचे असतात," असे मत त्यांनी व्यक्त केले
हेही वाचा :