सातारा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य (Udayanraje Bhosale) करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा लागू करण्याकरिता छत्रपतींचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन दिलं आहे. महापुरूषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांसाठी अजामीनपात्र आणि १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा पारित करण्याची त्यांनी मागणी केली.
आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांसह मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास प्रसिद्ध करावा, असे खरमरीत भाषेतील निवेदन छत्रपतींचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाहांना दिलं आहे.
काय म्हटलं आहे निवेदनात?- छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाच्या विचारातून स्वराज्याची स्थापना केली. राज्यकारभारात रयतेच्या सहभागातून लोकशाहीचा पाया रचला. मात्र, काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि राजमाता जिजाऊंबद्दल अवमानकारक भाष्य करत आहेत. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन समाजात दुफळी निर्माण होत असल्याचं खासदार उदयनराजेंनी निवेदनात म्हटलं आहे.
अजामीनपात्र कायदा पारित करा- महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तींची जीभ छाटण्याची धमक शिवप्रेमींमध्ये आहे. मात्र, आम्ही संयम राखून आहोत, असा इशारा खासदार उदयनराजेंनी निवेदनात दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं अशा प्रवृत्तींना धडकी भरवणारा अजामीनपात्र आणि १० वर्षे सश्रम कारावासासह जबर दंडाची शिक्षा असणारा विशेष कायदा पारित करावा. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कोणालाच अधिकार राहणार नाही, असंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.
तज्ज्ञांची कमिटी स्थापन करा- ऐतिहासिक चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेबसिरिज, डॉक्युमेंटरीजच्या चित्रिकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाला सहाय्यभूत ठरेल, अशी इतिहासकार, संशोधक आणि इतिहास तज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कमिटीच्या शिफारशी विचारात घेवून सेन्सॉरशिप लागू केल्यास इतिहासाच्या संदर्भातील संभाव्य विरोधाभास टाळता येईल. तसेच सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहील, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केलाय.
नवी दिल्ली आणि अरबी समुद्रात छत्रपतींचे स्मारक उभारा- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची प्रचिती देणारे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारणं गरजेचं आहे. या स्मारकामध्ये राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय स्तरावर संशोधन आणि संकलित केलेले अप्रकाशित दस्तावेज, चित्रे, शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक नोंदी, कलाकृती, युद्धनितीचा समावेश असावा. राजगड, रायगड, अजिंक्यतारा हे राजधानीचे किल्ले असणाऱ्या परिसराचा विकास करावा. अरबी समुद्रात छत्रपतींचे स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावे, अशा मागण्याही खासदार उदयनराजेंनी निवेदनात केल्या आहेत.
हेही वाचा-