मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झालीय. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतलीय. उदय सामंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी 'शिवतीर्थ' येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भेटीसंदर्भात खुलासा केलाय.
अतिशय चांगला नाश्ता केला आणि चहा प्यायलो : उदय सामंत यांनी भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलंय. अतिशय चांगला नाश्ता केला आणि चहा प्यायलो. माझी ही चौथी भेट आहे. खिचडी खाल्ली, पण कोणतीही राजकीय किंवा पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा नाही. राजकीय खिचडी ही वेगळी, पण मी आज खरी खिचडी खायला आलो होतो. या परिसरातून जात होतो म्हणून भेटायला आलो असल्याचंही उदय सामंतांनी सांगितलंय.
दरम्यान, आजच्या भेटीचे कारण काय? असा प्रश्न उदय सामंत यांना विचारला असता, मी या परिसरातून जात होतो. राज ठाकरेंना मी फोन केला. येऊ का असे विचारले ते बोलले या. म्हणून मी त्यांच्याकडे नाश्ता आणि चहा करण्यास आलोय. मात्र कोणतीही राजकीय चर्चा नाही. पालिका निवडणुकीबाबत भेट होती का, यावर बोलताना सामंत म्हणाले की, जर पालिका निवडणुकीबाबत भेट असती तर आम्ही एकत्रितरीत्या पत्रकार परिषद घेतली असती. मात्र आजच्या भेटीत पालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा नाही, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.
मी मंत्री कोणाचीही भेट घेऊ शकतो : मी पुन्हा सांगतो की, आज केवळ चहा आणि नाश्ता करायला आलो होतो. राजकीय खिचडीबाबत चर्चा नाही. तर मी खरी खिचडी खायला आलो होतो. आता तुम्हाला नाश्त्याचे नावही सांगितले. चांगला नाश्ता झाला. चहा प्यायलो यामुळे भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका. आता मी इथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी जाणार आहे. मग मी राज ठाकरेंचा निरोप घेऊन तिकडे गेलो, असा तुम्ही अर्थ काढणार का? तर असे होत नाही, शिवाजी पार्क हे मुंबईत आहे आणि मुंबई महाराष्ट्रात येते. मी राज्याचा मंत्री आहे. कुठेही जाऊ शकतो. कोणालाही भेटू शकतो, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.
त्यांनी आत्मपरीक्षण करावे...: दुसरीकडे उबाठा गटातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनामा देत आहेत आणि अन्य पक्षात प्रवेश करताहेत. असा प्रश्न मंत्री उदय सामंत यांना विचारला असता, एवढे आमदार, खासदार, नेते, नगरसेवक, पदाधिकारी पक्षाला का सोडून जाताहेत, याचे उबाठा गटाने आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी आत्मपरीक्षण करावे, असं सामंत म्हणाले. तसेच विजय वडेट्टीवार हे माझे चांगले मित्र आहेत. पण संपलेल्या पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा स्वत:कडे लक्ष द्यावे. विजय वडेट्टीवार यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असा टोला उदय सामंत यांनी काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांना लगावला. तसेच वडेट्टीवारांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं नाही म्हणून ते डिप्रेशनमध्ये गेल्याची टीकाही उदय सामंतांनी केलीय.
भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही : खरं तर उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यातील ही अलिकडची चौथी भेट आहे. सध्या तरी शिवसेना मंत्री आणि मनसे प्रमुख यांच्यातील भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दोघांमध्ये काय चर्चा झाली हेही कळू शकलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत युती होण्याची चर्चा होती. नेत्यांची ही बैठक त्या संदर्भात असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हेही वाचा -