ठाणे : प्रेमाचं नाटक करत लग्नाच्या आणाभाका घेत दगाबाज प्रियकरानं तरुणीला जाळ्यात ओढलं. त्यानंतर बहाण्यानं वेगवेगळ्या लॉजवर नेऊन बलात्कार केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना ठाण्यातील विविध परिसरात घडल्या. या दोन्ही दगाबाज प्रियकरांनी पीडित तरुणींना घेऊन जात त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेप्रकरणी भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी दिली आहे. तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच दोन्ही दगाबाज प्रियकर फरार झाले आहेत. शशी मारू आणि महेश गणेश शेलार अशी फरार झालेल्या दगाबाज प्रियकरांची नावं आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर अत्याचार: लग्नाचं आमिष दाखवून तरुणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच अशाच प्रकारच्या दोन घटना नारपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत 21 वर्षीय तरुणी ही मुंबई शहरातील गोवंडी भागात कुटुंबासह राहते. त्यातच तिचं आरोपी शशी याच्याशी प्रेमाचं सूत जुळलं. त्यानंतर पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून शशी मारू या दगाबाजानं पीडित तरुणीच्या इच्छेविरुद्ध भिवंडीतील एका लॉजमध्ये जून 2024 मध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मात्र पीडितेला दगाबाजानं लग्नास नकार दिला आहे. याप्रकरणी 23 एप्रिल रोजी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
लग्नाच्या आमिषाने पीडितेच्या बाल मनाचा फायदा घेऊन बलात्कार : दुसऱ्या घटनेत 19 वर्षीय तरुणी भिवंडी तालुक्यातील एका गावात कुटुंबासह राहते. ती अल्पवीयन असतानाच तिचं रायगड इथल्या महेश गणेश शेलार या तरुणासोबत प्रेमाचं सूत जुळलं. त्यानंतर आरोपीनं लग्नाच्या आमिषानं पीडितेच्या बाल मनाचा फायदा घेऊन तिच्यावर भिवंडीतील लॉजमध्ये जून 2023 ते 21 एप्रिल 2024 पर्यंत वारंवार अत्याचार केला. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी महेशनं त्याच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पीडित तरुणीसोबतचे फोटो अपलोड करून तिचं लग्न दुसरीकडं होवू देणार नाही, अशी धमकी देवून पीडितेची बदनामी केली आहे.
आरोपीविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा : याप्रकरणी पहिल्या गुन्ह्यातील प्रथम मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा 00/2025 अन्वये नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करून आरोपी शशीच्या विरोधात भादवि कलम 376 प्रमाणं गुन्हा दाखल केला. दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी महेशच्या विरोधात प्रथम भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून भादवि कलम 376 (2) (छ), 417,500, 506 सह लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणं गुन्हा दाखल करून हा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. तर पोलिसांची कुणकुण लागताच दोन्ही आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :
- धक्कादायक! ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्कार, नराधमास अटक - WOMAN RAPED
- विवाहितेवर सामूहिक बलात्कार करुन नराधम झाला फरार: सात वर्षानंतर पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आवळल्या मुसक्या
- 'लिव्ह इन रिलेशनशीप'मध्ये राहणाऱ्या पीडितेवर प्रियकराच्या भावांचा बलात्कार: वाळूज पोलिसात गुन्हा दाखल