सोलापूर : सोलापुरातील पाहिले न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी माहिती देताना सांगितलं, "सदर बाजार पोलीस ठाण्यात आत्महत्येबाबत नोंद करण्यात आली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून अंतिम संस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे." अंतिम विधीच्या सर्व विधी पार पाडल्यानंतर सोलापूर पोलीस डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणार आहेत.
डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येनं वैद्यकीय क्षेत्र हादरलं : न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूरमध्ये न्यूरो क्षेत्रात क्रांती घडवून आणली होती. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जात होतं. परंतु, शुक्रवारी रात्री राहत्या घरी डॉ. वळसंगकर यांनी स्वतः रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं. बंदुकीचा आवाज येताच नातेवाईकांनी डॉ. वळसंगकर यांच्या बेडरूमकडं धाव घेतली. त्यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर बेडरुममधील बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. जखमी अवस्थेत डॉ. वळसंगकर यांना त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टरांनी आत्महत्या केल्यानं राज्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरलं आहे.
डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होणार : "सोलापूर पोलिसांनी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी ज्या घरात आत्महत्या केली, त्या निवासस्थानी जाऊन पंचनामा केलाय. मृतदेहाचे पोस्टमार्टम करून शनिवारी दुपारी अंतिमविधीसाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी माहिती देताना सांगितले, डॉक्टरांनी आत्महत्या का केली? आत्महत्येचे नेमके कारण काय? याबाबत पोलीस तपास सुरू आहे. या आत्महत्येची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून पुढील कारवाई करतील," असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा :