मुंबई : पाकिस्तानला भारताविरोधात उघड पाठिंबा देणाऱ्या तुर्की कंपनीला भारतातून गाशा गुंडाळावा लागलाय. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीची 70 टक्के देखभाल करणाऱ्या तुर्कस्तानस्थित कंपनीचा करार राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर तत्काळ रद्द करत असल्याचं विमानतळ प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे.
सेलेबी एअरपोर्ट सर्विसेस (Celebi NAS) या तुर्कस्तानस्थित कंपनीकडून मुंबई विमानतळावरील धावपट्टीचं ग्राऊंड हँडलिंग केलं जात होतं. भारत-पाकिस्तान तणावामध्ये तुर्कस्ताननं पाकिस्तानला उघड पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीत या तुर्की कंपनीला देशातील अतिमहत्त्वाच्या विमानतळावर मुक्त वावर देणं हे देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. तेव्हा या कंपनीकडून सर्व काम काढून घेतली जावीत, अशी मागणी करत शिवसेना शिष्टमंडळानं सोमवारी चीफ एअरपोर्ट ऑफिसर विष्णू झा यांची भेट घेतली होती.
एएआयला शिवसेनेकडून 10 दिवसांची मुदत : एअरपोर्ट अथॉरिटीच्या कार्यालयात यासंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं भेट देत त्यांना आपलं निवेदन सादर केलं. तसेच त्यांना या कंपनीला हद्दपार करण्यासाठी दहा दिवसांचा अवधी देण्यात आला. मात्र या मुद्याला गंभीरतेनं घेत प्राधिकरणानं तिसऱ्या दिवशीच या कंपीनाला हद्दपार केल्याचं जाहीर केलं आहे. शिवसेनेच्या या शिष्टमंडळात स्थानिक आमदार मुरजी पटेल, विभाग प्रमुख कुणाल सरमळकर, युवासेना नेते अर्जुन कंधारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तुर्की कंपनीला विरोध का : भारत पाकिस्तान सीमाभागात सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तान जेव्हा भारतावर ड्रोन हल्ले करत होता, तेव्हा चीन आणि अरजबैजानसह तुर्कस्ताननंही पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला आहे. इतकंच नव्हे तर त्यांचं एक मालवाहू विमान युद्धजन्य परिस्थितीत तातडीनं पाकिस्तानात पाठवण्यात आलं. या विमानातून पाकिस्तानला काही शस्त्र पाठवण्यात आल्याची जोरदार चर्चा होती. तसेच भविष्यात गरज पडल्यास अधिक मदतीच आश्वासन दिल्याचीही चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातून या कंपनीला हद्दपार करावं अशी मागणी सत्ताधारी शिवसेना पक्षाकडून विमानतळ प्राधिकरणाकडे करण्यात आली होती, जी मान्य करण्यात आली आहे.
हेही वाचा :