ई-केवायसीसाठी आदिवासी परिसरातील 'लाडक्या बहिणी' चढल्या डोंगरावर; योजनेचा लाभ घेणं ठरतंय आव्हान"
'लाडकी बहीण योजने'चा लाभ घेण्यासाठी सरकारनं ई-केवायसी बंधनकारक केलं आहे. त्यामुळं खर्डी खुर्दमधील महिलांना डोंगरावर नेटवर्कच्या शोधात तासनतास थांबावं लागत आहे.

Published : October 10, 2025 at 5:02 PM IST
|Updated : October 10, 2025 at 7:30 PM IST
नंदुरबार : 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून अनिवार्य असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील खर्डी खुर्द गावातील महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. गावात नेटवर्क असूनसुद्धा इंटरनेटची सुविधा अत्यंत कमकुवत असल्यानं 'लाडक्या बहिणीं'ना ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी रेंज मिळेल, या आशेवर डोंगरावर तासनतास बसावं लागत आहे.
राज्यात मुलभूत सुविधा नाहीत अन् योजनेसाठी ई-केवायसी : राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु, त्यापैकी अनेक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांना त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा हे माहिती नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं प्रत्येकाला बंधनकारक केलं आहे. त्यामुळं ज्या भागात रस्ते नाहीत, वीज नाही, पिण्याची पाण्याची सोय नाही आणि नेटवर्क नाही, अशा मुलभूत सुविधा नसलेल्या ठिकाणी महिलांवर ई-केवायसी करण्याची वेळ आली आहे.
ई-केवायसी बंधनकारक केल्यामुळं महिलांचे हाल : राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक केलं आहे. यामुळं लाडक्या बहिणींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या प्रक्रियेसाठी मोबाईल नेटवर्क आणि जलद इंटरनेट आवश्यक असते. परंतु, गावात चांगली सुविधा नसल्यानं महिलांना गाव सोडून नर्मदा काठावरील उंच टेकडीवर पायपीट करत जावं लागतं. टेकडीवरही नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्यानं अनेक महिला झाडाच्या फांद्यांवर काठीला मोबाईल बांधून ठेवतात. जेणेकरून सिग्नल मिळून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल. एका बाजूला मोबाईल झाडावर आणि दुसऱ्या बाजूला नेटवर्क मिळण्याची वाट पाहत महिला तासनतास बसून असतात.
नेटवर्कसाठी शोध उंच टेकडीचा : ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी नेटवर्क आवश्यक आहे. मात्र, अतिदुर्गम भागात असलेल्या काही गावांमध्ये नेटवर्क नसल्यामुळं लाडक्या बहिणींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. उंच टेकडीवरही कधी नेटवर्क गायब होते, तर कधी सरकारी संकेतस्थळ चालत नाही, अशा तक्रारी महिलांनी केल्या आहेत. जर संकेतस्थळ (Website) सुरू झाले तर 'ओटीपी' (OTP) येत नाही. या समस्येमुळं अनेक महिलांना निराश होऊन परतावे लागते. एकंदरीत योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया सुलभकरण्याऐवजी नेटवर्कच्या अडचणीमुळं ती एक मोठी परीक्षाच ठरली आहे. खर्डी खुर्द गावात नेटवर्कची मोठी समस्या आहे. 'लाडकी बहीण'च्या ई- केवायसीसाठी आदिवासी महिलांना नेटवर्कसाचा शोध घ्यावा लागतोय आहे. या समस्येवर प्रशासनानं यावर तातडीनं मार्ग काढावा अशी मागणी लाडक्या बहिणींमधून होत आहे.
हेही वाचा :

