अहिल्यानगरः चैत्र महिन्यात गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथील यात्राही वैशिष्ट्यपूर्ण अशीच असते. नवनाथ आणि वीरभद्र महाराजांची गळवंतीची मिरवणूक पाहण्यासारखी आहे. या गळवंतीला गळी लागण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे.
वीरभद्र मंदिरातून देवाच्या मुखवट्याची मिरवणूक : ग्रामीण भागात गावोगावी यात्रा भरते. प्रत्येक यात्रेची प्रथा, परंपरा ही वेगवेगळी असते. गावात ग्रामदेवतेच्या यात्रेसाठी लाखो भाविकांची मांदियाळी दिसत असते. अशातच शिर्डीजवळील राहाता येथील वीरभद्र आणि मायंबा यात्राही अशीच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. दरवर्षी हनुमान जयंतीला यात्रेची सुरुवात होते. सलग दोन दिवस ही यात्रा सुरू असते. या यात्रेत पहिल्या दिवशी गावातील वीरभद्र मंदिरातून देवाच्या मुखवट्याची मिरवणूक निघते. मुखवट्यासमोर ग्रामस्थ डफांचा खेळ खेळतात. डफांच्या तालावर काठ्या नाचवल्या जातात. मिरवणुकीसाठी एक खास असा गाडा बनवला जातो. गाड्यावर हत्तीच्या आकाराची प्रतिकृती बनवून त्यावर बगाड अटकवतात. बगाडाच्या दोन्ही बाजूला नवसाची लहान मुले लटकवतात आणि त्यांची वाजतगाजत अन् फटाक्यांची आतषबाजी करत शोभा मिरवणूक काढली जाते. मायंबा मंदिरासमोर रथ पोहोचला की, मायंबाला नवस करणारे भाविक गळी लागतात. दुसऱ्या दिवशी अशीच मिरवणूक मायंबा मंदिरापासून वीरभद्र मंदिरासमोर आणली जाते. राजा वीरभद्राला जे नवस करतात, ते गळवंतीला गळी लागतात.
वीरभद्र देवाचं जागृत देवस्थान : ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली ते भाविक दिवसभर कडक उपवास धरतात. गळी लागेपर्यंत हा उपवास ठेवला जातो. दुसऱ्या दिवशीची मिरवणूक वीरभद्र मंदिरासमोर आल्यानंतर रात्री 8 वाजल्यापासून रथाला गळी लागण्यासाठी नंबर सुरू होतात, ते पहाटे सहा वाजेपर्यंत सुरू असतात. मनोकामना केलेल्यांमध्ये खास करून महिलांची संख्या ही मोठी असते. यावेळी दोन हजारांहून महिलांनी यात सहभाग घेतला होता. गळवंतीला गळी लागण्याची प्रथा गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू आहे. राहाता येथील वीरभद्र देवाचं जागृत देवस्थान आहे. स्थानिकच नाही तर राज्यातील विविध भागातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

काय असते गळवंती? : रथाच्या दोन्ही बाजूला तराजूसारखं बनवलं जातं. दोन्ही बाजूला गळी लागणारे भाविक लटकतात. दोर घेऊन खाली उभे राहणारे सारथी भाविकाला ओढत रथाला प्रदक्षिणा घालतात. हा एक अनोखा थरार आहे. भाविक हा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यात कोणाताही अघोरी प्रकार नसतो.
हेही वाचा -