सातारा - सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळं एक महिना बंद ठेवण्याच्या निर्णयावरून जिल्हाधिकाऱ्यांनी चोवीस तासांच्या आत घुमजाव केलं. पर्यटनाचा आनंद घेता यावा, म्हणून पर्यटनस्थळांवर कोणत्याही स्वरूपाची बंदी नाही. मात्र, सुरक्षिततेच्यादृष्टीने प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटताना अपघात होणार नाही. जीवावर बेतणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.
पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त- जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असणारी सर्व पर्यटनस्थळं एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गुरुवारी (19 जून) घेतला होता. तसंच पावसाळी पर्यटनावर निर्बंध घालत सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटनस्थळांच्या परिसरात 20 जून ते 19 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेशही जारी केले होते. त्यामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
पावसाळी पर्यटनस्थळं बहरणार - सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूरचा उलटा धबधबा, ऊरुल घाटातील शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी याठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. याठिकाणी पर्यटनावर बंदी नसून फक्त निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आता ही पर्यटनस्थळं गर्दीनं गजबजणार आहेत.
'या' गोष्टींवर प्रशासनानं घातले आहेत निर्बंध
- पावसामुळे वेगानं वाहणाऱ्या पाण्यात उतरणे आणि पोहणे.
- धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
- पावसामुळे धोकादायक झालेले धबधबे, डोंगरदऱ्यांचे कठडे, याठिकाणी सेल्फी काढणे, चित्रिकरण करणे.
- धबधब्यांच्या परिसरात मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, बेकायदेशीर मद्य विक्री करणे आणि उघड्यावर मद्य सेवन करणे.
- वर्दळीच्या रस्त्यावर धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
- वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल अशा रितीने चालविणे.
- बेदकारपणे वाहन चालवून धोकादायकपणे इतर वाहनांना ओव्हरटेक करणे.
- सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्य उघड्यावर फेकणे.
- महिलांची छेडछाड, टिंगल, असभ्य वर्तन, अश्लिल हावभाव, लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
- सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत वाजविणे, डीजे लावणे, वाहनातील स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणी वाजवून ध्वनी प्रदूषण करणे.
- ध्वनी, वायू व जल प्रदुषण होईल, अशी कोणतीही कृती करणे.
- धबधबे, धरणे आणि नदी परिसरात दुचाकी, चारचाकी व सहाचाकी (अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळून) वाहनांना प्रवेश करण्यास मनाई असणार आहे.