ETV Bharat / state

"पहिल्याच पावसात मुंबईकरांचे हजारो कोटी पाण्यात गेले, केवळ श्रेयवादासाठी मेट्रोचं उद्घाटन", संजय राऊतांचा हल्लाबोल

भाजपा हा शेठजीचा पक्ष आहे. त्यांनी आम्हाला शिकवू नये, असंही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut
संजय राऊत (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2025 at 11:40 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : सोमवारी पडलेल्या मुंबईत पावसानं थैमान घातल्यामुळं नागरिकांची दैना उडाली. पावसामुळं मुंबईची तुंबई झाली. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना, आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मेट्रोच्या घोटाळ्यात सत्ताधाऱ्यांना दीड हजार कोटींची दलाली मिळाली आहे. मुंबईतील कामांमध्ये 35 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा भाजपा आणि शिंदे गटानं केलेला आहे आणि त्या पैशांतून पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना विकत घेतलं जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

श्रेयासाठी मेट्रोचं उद्घाटन : मुंबईच्या पहिल्या पावसात मुंबईकरांचे हाल झाले. मेट्रोचं काम पूर्ण झालं नव्हतं. तर मग उद्घाटनाची घाई कशाला केली? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "केवळ श्रेय घेण्यासाठी भूमिगत मेट्रोचं उद्घाटन केलं. मुंबईकरांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले. याला जबाबदार राज्य सरकार, प्रशासन आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. तसंच, आता साडेतीन वर्षांपासून सत्ता यांच्या हातात, मग यांनी नालेसफाई का केली नाही?" असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

अमित शाहांनी राजीनामा दिला पाहिजे : "ऑपरेशन सिंदूर हे अयशस्वी झालेलं ऑपरेशन आहे. हे काय केलं, तर पहलगाममध्ये पर्यटकांना दहशतवाद्यांना मारलं म्हणून, पण गृहखात्याचं काम अतिशय अपयशी, बिनडोक आहे. याला सर्व जबाबदार अमित शाह आहेत. त्यामुळं पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा राजीनामा घेतला पाहिजे. अमित शाहांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिनबाबत एक वक्तव्य केलं आहे की, त्यांचं सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर नाही... तसं आत्ताच्या सत्ताधाऱ्यांबाबत म्हणावं लागेल," अशी टीका खासदार संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर केली. तसंच, "आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे बघून पश्चाताप झाला असता," असं राऊत म्हणाले.

हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान : दरम्यान, "आज बाळासाहेब ठाकरे असते तर केंद्र सरकारनं पाकिस्तानबाबत घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं असतं," असं वक्तव्य अमित शाहांनी केलं आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारला असता, ते म्हणाले, "उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत, म्हणून तुम्हाला राग आहे. त्यामुळं तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना फोडली. तुम्ही येथे जे बेईमानीचं बीज पेरलं. त्याला आम्ही शरण गेलो नाही म्हणून तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना फोडली आणि हे बघून बाळासाहेबांनी तुम्हाला मिठी मारली असती का? हा तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करताय," असं संजय राऊत म्हणाले.

...त्याला जबाबदार गृहमंत्री अमित शाह : "पहलगाम येथे दहशतवाद्यांनी ज्या २७ महिलांचं सिंदूर पुसलं. त्यानंतर आपल्या सैन्यांनं युद्ध केलं. पण युद्ध मध्येच मागे घेतलं. हे सावरकरांना पटलं असतं का? आणि अमित शाह हे महायश स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन काय व्याख्यान देणार, ज्या २७ महिलांचं सिंदूर पुसलं गेलं आहे. त्याला जबाबदार गृहमंत्री अमित शाह आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, " अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली. तसंच, "अमित शाह हे देशावर लादलेले गृहमंत्री आहेत. भाजपा हा शेठजीचा पक्ष आहे. त्यांनी आम्हाला शिकवू नये," असंही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस, लोकल सेवा सुरळीत सुरू, आज यलो अलर्ट
  2. केजीएस शुगर अँड इन्फ्रावर ईडीची छापेमारी, 350 कोटींचं कर्ज बुडवल्याप्रकरणी कारवाई
  3. बीडवर शोककळा! धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरनं सात तरुणांना चिरडलं; 6 जण ठार