पुणे- गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचा उन्हाळा वाढला आहे. उन्हाच्या झळांनी धरणांतील पाण्यासाठातही कमालीची कपात होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. परंतु लवकरच हा उन्हाच्या झळांपासून मुक्तता होणार आहे. कारण यंदा मान्सूनसाठी सकारात्मक वातावरण असून, लवकरच तो केरळच्या किनारपट्टी भागात पोहोचणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यात जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
पाऊस सरासरी किंवा त्याहून अधिक बरसेल : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदाच्या मान्सूनसाठी सकारात्मक अंदाज वर्तवला असून, जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशभरात सरासरी 870 मिमी पाऊस पडतो. यंदा 89 टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच पाऊस सरासरी किंवा त्याहून अधिक बरसेल, तर कमी पावसाची शक्यता फक्त 11 टक्के आहे. ‘एल निनो’ आणि ‘निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल’ हे हवामानावर परिणाम करणारे घटक यंदा प्रभावी राहणार नाहीत. त्यामुळे समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य भारत आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता 75 टक्क्यांहून अधिक आहे. यामुळे शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असणार आहे, असंही हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ. सुदीप कुमार म्हणालेत.
मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस बसरणार : जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत हा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतात काश्मीरचा काही भाग वगळता इतर ठिकाणी सामान्य ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. कारण एलनिनोचा प्रभाव यंदा मान्सूनवर कमी प्रमाणात पडण्याची परिस्थिती आहे. अरबी समुद्रातील तापमानही सध्या सामान्य राहणार आहे. या दोन्ही कारणांमुळेच यंदा जोरदार पाऊसधारा कोसळणार आहेत. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस बरसणार असून, पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळेच या पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा पोहोचणार आहे, अशी माहिती हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ. सुदीप कुमार यांनी दिलीय.
हेही वाचा :