कोल्हापूर : 'शहाण्या माणसांनं कोर्टाची पायरी चढू नये' अशी म्हण प्रसिद्ध आहे. कुटुंबातील वादविवाद, भांडण-तंटे अशा न्यायालयीन प्रकरणांमध्ये केस लढवून हयात घालवलेली माणसं कोर्ट कचेऱ्या म्हटलं की, चार पावलं मागं सरकतात. मात्र, आता कोणत्याही न्यायालयीन कामांसाठी मोफत 'कायद्याचा दवाखाना' सुरू झाला आहे. कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयाकडून ही अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे. आरोग्य शिबिराच्या धर्तीवर चालणाऱ्या कायद्याचा फिरता दवाखान्याच्या माध्यमातून कायदेशीर मोफत सल्ला मिळणार आहे. हा राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम असल्याचा दावा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण पाटील यांनी केला.
कायद्याच्या दवाखान्यातून मिळणार मोफत सल्ले : "कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना कायद्याच्या दवाखान्यातून मोफत कायदेविषयक सल्ला, मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळणार आहे. कायद्याच्या दवाखान्याच्या माध्यमातून घराघरातील असणारे छोटे-मोठे वादविवाद, तंटे पूर्णपणे मिटतील. समाजामध्ये सलोखा आणि शांतता नांदावी या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शहाजी विधी महाविद्यालयानं हे पाऊल उचललं आहे. विविध आरोग्य शिबिरामार्फत वेगवेगळ्या आजारांवर उपचार आणि प्रबोधनात्मक मार्गदर्शन केलं जातं. त्याचप्रमाणे समाजातील विविध वाद, तंटे-बखेडे आणि न्यायालयीन प्रकरणांबाबत कायद्याच्या दवाखान्यातून मोफत सल्ला, मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळणार आहे. घराघरांत असणारे वादविवाद, तंटे या मोफत कायदा सहाय्य दवाखान्याच्या माध्यमातून मिटावेत आणि लोकांपर्यंत ही अभिनव संकल्पना पोहोचावी या उद्देशानं हा उपक्रम महाविद्यालयानं सुरू केला आहे." अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण पाटील यांनी दिली.
चौका-चौकात फिरता कायद्याचा दवाखाना : तीन महिने कोल्हापूर शहरातील चौकाचौकात फिरता कायद्याचा दवाखाना स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून लोकांना विविध कायदेशीर तरतुदींची माहिती आणि त्यांचं समुपदेशन केलं जाणार आहे. या माध्यमातून विनामूल्य सल्ला आणि कायद्याशी संबंधित कोणत्याही प्रश्नांचं निशुल्क मार्गदर्शन केलं जाणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजू नागरिकांना विशेष मदत करण्यात येणार आहे. तर, तीन महिन्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या गावात आणि ग्रामीण भागात ही अभिनव संकल्पना राबवण्यात येणार आहे.
विधी महाविद्यालयातील तज्ञ करणार मार्गदर्शन : कोल्हापुरातील 'शहाजी विधी महाविद्यालय' पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेलं महाविद्यालय म्हणून ओळखलं जातं. महाविद्यालयातून अनेक चांगले वकील घडले आहेत. कायद्याचा फिरता दवाखान्यात मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ आणि महाविद्यालयाच्या तज्ञ वकिलांचा सल्ला नागरिकांना मोलाचा ठरणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्यानं नागरिकांना मोफत सल्ला मिळणार आहे.
हेही वाचा :