मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे उद्या (बुधवारी) सूप वाजणार आहे. गेल्या शुक्रवारपासून सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होतेय. दरम्यान, आज अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. यावेळी, विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कशी खोटी माहिती दिल्याचं सांगत सभागृहाचा वारंवार काही लोकांकडून कसा अपमान होतोय. विरोधक कसे निष्क्रिय ठरतायेत. तसंच, विरोधकांकडून जे पाहिजे ते मुद्दे मांडले जात नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलीय.
विरोधकांकडून खोटी आकडेवारी : अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत ४२ सदस्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि विरोधकांनी कायदा व सुव्यवस्था, महिला अत्याचार, गुन्हेगारी, बेरोजगारी, उद्योग या बाबतीत सरकारवर टीका केली. तसंच, विरोधकांनी गुन्हेगारीबाबत काही आकडेवारी सादर केली. पण ही आकडेवारी खोटी आहे. महाराष्ट्र हा गुन्हेगारीत दोन नंबरचा आहे, असं जयंत पाटील आणि नाना पाटोले यांनी सांगितलं. मात्र महाराष्ट्रात हा गुन्हेगारी दोन नंबरला नसून, विरोधकांनी सभागृहात खोटी माहिती दिलीय. डिजिटलच्या माध्यमातून आरोपींचे देशातील कुठल्याही कोपऱ्यातून रेकॉर्ड तपासता येणार आहे. सायबर क्राइमची तक्रार १९४ या नंबरवर आता करता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसेभेत दिलीय.
विरोधकांना मी प्रशिक्षण देण्यास तयार : "विरोधकांकडे भलेही संख्याबळ नसेल. परंतु विरोधकांनी काही मुद्दे जे मांडायला हवे होते. ते मांडले नाहीत. ते अजूनही विरोधकांच्या भूमिकेत गेलेले दिसत नाहीत. त्यामुळं त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. हवं तर मी उद्धवजी आणि सुधीरभाऊंची मदत घेऊन विरोधकांना प्रशिक्षण देण्यास तयार आहे", असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
हक्कभंग समितीला नखंच उरली नाहीत : "पूर्वी कुणीही वादग्रस्त, असंसदीय किंवा सभागृहात चुकीचं बोललं की त्याची हक्कभंग समितीकडे तक्रार जायची. पण आता आपली हक्कभंग समिती किंवा हक्कभंगाची व्यवस्था ही ट्रूथलेस झाली आहे, तिला आता नखंच उरली नाहीत. कारण तीच तीच माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात. मंत्र्यांवर दबाव आणतायेत. सभागृहाचा सन्मान राखला जात नाही", अशी नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय. तसंच, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरानं आक्षेपार्ह हिंदी कविता म्हटली. सभागृहानं त्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरिता ठाकरे गटाच्या एक महिला नेत्या तीच कविता पुन्हा वाचतात. त्याचा अर्थ काय आहे. तुम्ही इथे बसलेल्या २८८ लोकांची काय औकातच नाही. हा त्याचा अर्थ आहे", अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधलाय.
विरोधकांना दंगोखोरांचा एवढा पुळका का? : याचबरोबर, "गृहमंत्री म्हणून प्रत्येक गोष्टीत मला टार्गेट केलं जातंय. काही जरी झालं तरी गृहमंत्री म्हणून मला लक्ष्य केलं जातंय. राज्यात मागील दहा वर्षात गुन्हेगारी कमी झाली आहे. याचा अर्थ गुन्हेगारी होत नाही किंवा सर्व काही आलबेल आहे, असं नाही", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "विरोधकांना दंगोखोरांचा एवढा पुळका का? बदलापूर घटनेत अक्षय शिंदे याला फाशीची मागणी विरोधकांनी केली होती. पण अक्षय शिंदे हा स्वातंत्र्य सेनानी आहे का?" असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत विरोधकांवर निशाणा साधलाय.
हेही वाचा :