सांगली- जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेण्याचा निर्णय घेतलाय. ठाकरे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह 10 तालुका प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. आज 26 मार्च रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तगिरी बंगल्यावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी संजय विभुतेंसह सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख, पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
अनेक गावचे सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पक्ष सोडणार : संजय विभुते यांच्यासह अनेक कट्टर शिवसैनिक हे ठाकरे गटाच्या शिवसेनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रश्नांवर आंदोलन, मोर्चा काढण्याबरोबर पक्ष संघटनेसाठी काम करीत आहेत. मात्र राज्यातल्या सत्ता बदलानंतर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्षांतर केलंय, त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटातल्या नेत्यांनीदेखील शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय, या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडालीय. तर मोठ्या प्रमाणात जिल्हाप्रमुखांसह तालुकाप्रमुख, अनेक गावचे सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पक्ष सोडणार आहेत, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम शिवसेना ठाकरे गटावर पाहायला मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
माझ्या राजकीय कारकिर्दीला वर्ष 2002 मध्ये सुरुवात : याबाबत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते म्हणाले की, मी माझ्या राजकीय कारकिर्दीला वर्ष 2002 मध्ये शिवसेना शाखाप्रमुख नेवरी तालुका कडेगाव येथून सुरुवात केलीय, विभागप्रमुख, त्यानंतर उपतालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि 2017 पासून जिल्हाप्रमुख, दोन वेळेस जिल्हा परिषदेची निवडणूक आणि एक वेळेस विधानसभेची निवडणूक मी पूर्ण ताकतीने लढण्याचा प्रयत्न केलाय. 23 वर्षांमध्ये शिवसेनेचे काम इमानदारीने करून सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना घराघरात पोहोचवण्याचे काम सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी शिवसैनिकांना बरोबर घेऊन प्रामाणिकपणे केलंय. यामध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपलं आयुष्य पक्षासाठी वेचलं. खरं तर शिक्षण सम्राट, उद्योग सम्राट, सहकार सम्राट यांचा हा जिल्हा असताना येथे पक्ष वाढवित असताना तारेवरची कसरत करावी लागते, असे असताना सत्ता असो अथवा नसो सांगली जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना कधीच न्याय मिळाला नाही ही खरी आमची खंत आहे, असंही विभुतेंनी अधोरेखित केलंय.
नेतृत्वाचे दुर्लक्ष खऱ्या अर्थाने आमच्यासाठी नेहमी अडचणीचं : ग्रामीण भागाकडे होत असलेले नेतृत्वाचे दुर्लक्ष खऱ्या अर्थाने आमच्यासाठी नेहमी अडचणीचं ठरलंय. म्हणून कुठेतरी राजकीय जीवनामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल आणि आपल्या कर्तृत्वाला योग्य न्याय मिळेल, अशा भावनेतून आम्ही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून ज्या पद्धतीने अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचे काम त्यांनी केलंय, सर्वात महत्त्वाचं सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला भेटून त्याच्या अडीअडचणी समजून घेण्याचं काम ज्यांनी केलं, त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आज शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची भावना संजय विभुते यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा :