"युतीबाबत किंवा एकत्र येण्याबाबत दोन भाऊच ठरवतील", नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे? वाचा सविस्तर...
मनसे आणि शिवसेना (उबाठा) युतीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.


Published : June 5, 2025 at 3:09 PM IST
मुंबई : "आमच्यातील मतभेद हे खूप लहान आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राचे प्रश्न खूप मोठे आहेत", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. यानंतर उद्धव ठाकरेंकडून ही याला सकारात्मक प्रतिसाद आला होता. त्यामुळं राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या दोन भावांनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावं, अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र चर्चेचं गुऱ्हाळ काही पुढं जाताना दिसत नाही. दरम्यान, आता मनसे आणि शिवसेना (उबाठा) युतीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
दोन भाऊच ठरवतील... : गुरुवारी अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे-उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "युती करायची की नाही किंवा एकत्र यायचे की नाही, याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊच ठरवतील. यावर मी बोलून काही फरक पडणार नाही. एकत्र येण्याबाबत मला काही इश्यू नाही. दोन भावांकडे दोघांचेही मोबाईल नंबर आहेत. त्यामुळं याच्यावर बाहेरून कोणी किती बोलण्यापेक्षा हे दोन भाऊ एकत्र बसून यावर चर्चा करत नाहीत, तोपर्यंत काही होणार नाही. तसंच कोरोना काळात राज साहेबांनी स्वत:हून उद्धव साहेबांना फोन केला होता की, कोव्हिड हे भयंकर संकट आहे. सरकार कोणाचंही असो आपण एकत्र लढलं पाहिजे," असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.
जर इच्छा असेल तर त्यांनी... : याचबरोबर, "युतीबाबत फक्त मीडियामध्ये किंवा वर्तमानपत्रात बोलून अशी युती होत नाही. त्यांची जर इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा," असं अमित ठाकरे म्हणाले. तसंच, "रोज सकाळी उठून जे बोलतायेत ते तुम्ही ऐकताय... कोणाला फसवताय?, " असं म्हणत अमित ठाकरेंनी शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांचं न नाव घेता त्यांना टोला लगावला. दरम्यान, तुम्हाला युती व्हावी असं वाटतं का? असा प्रश्न अमित ठाकरेंना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, "जी राजसाहेब यांची इच्छा आहे. आणि जो राजसाहेब निर्णय घेतील. तीच माझी इच्छा आहे," असं अमित ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र हितासाठी... : दरम्यान, मनसे आणि शिवसेना (उबाठा) युतीबाबत बोलताना नुकतेच आदित्य ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्र हितासाठी कोणालाही सोबत घेण्याची आमची तयारी आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर आता यावर मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमित ठाकरे यांनीही युतीबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील, असं वक्तव्य केलं आहे. मात्र दोन्हीकडून जोपर्यंत चर्चा होत नाही आणि एकत्र बसून निर्णय घेत नाहीत. तोपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा :

