ETV Bharat / state

ग्रहणासंबंधी सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती, संस्थांवर कायदेशीर कारवाई करा, अंनिसची शासनाकडे मागणी

ग्रहणासंदर्भातील अंधश्रद्धेविरोधात प्रबोधनाची मोहीम देखील समितीनं हाती घेतली आहे. दाभोलकर यांनी यासंदर्भात सरकारकडे मागणी केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By

Published : September 8, 2025 at 8:59 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

सातारा : ग्रहणासंदर्भात मीडिया, सोशल मीडियावर अफवा आणि अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आता आक्रमक झाली आहे. कोणतीही डॉक्टरी डिग्री नसताना सल्ला मसलत करणाऱ्या ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर बोगस डॉक्टर म्हणून सरकारनं कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. हमीद दाभोलकर यांनी हे प्रसिद्धी पत्रक ईटीव्ही भारतला दिलं आहे. तसंच ग्रहणासंदर्भातील अंधश्रद्धेविरोधात प्रबोधनाची मोहीम देखील समितीनं हाती घेतली आहे.



सोशल मीडियावर अंधश्रद्धेचा बाजार : अंनिसनं पत्रकात पुढं म्हटलं आहे की, काल (रविवारी) रात्रीच्या ग्रहणाविषयी सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवण्यात आल्या. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात एकाच जागेवर बसावं, पाणी पिऊ नये, मलमूत्र विसर्जन करू नये, अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक सल्ले देण्यात आले. ग्रहणाचा गरोदर बाईच्या पोटातील गर्भावर दुष्परिणाम होतो, अशा अफवाही पसरवण्यात आल्या होत्या. अशा सल्ल्यामुळे तीन वर्षांपूर्वी साताऱ्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता.



चांद्रयानाची तयारी करणारा देश अंधश्रद्धेला बळी : राज्यातील स्त्री रोग तज्ज्ञांच्या संघटनांनी गर्भवती महिलांवर ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही, हे वारंवार सांगितलं आहे. तरीही अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडियावर ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवण्यात आली. चंद्रावर यान पाठवण्याची तयारी करणारा आपला देश अजून ग्रहणाच्या संबंधातील अंधश्रद्धांना बळी पडत असल्याची खंत अंनिसनं पत्रकात व्यक्त केली आहे.


न्यायालयाच्या आदेशाची करून दिली आठवण : चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. दर सहा महिन्यानंतर पृथ्वी, चंद्र आणि सूर्य हे समान पातळीमध्ये आल्यानंतर होणारा सावल्यांचा तो खेळ किंवा परिणाम असतो. त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नसतो. कोरोनाविषयी तसंच अॅलोपॅथी विषयी रामदेव बाबांच्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं अशा गोष्टींच्या विषयी तक्रार करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याचा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींच्या आणि संस्थांवर सरकारनं कठोर कारवाई करण्याची मागणी अंनिसनं पत्रकात केली आहे.



बोगस डॉक्टर म्हणून त्यांच्यावर कारवाई करा : ग्रहणाविषयी गर्भवती महिलांच्या अनुषंगाने पसरलेल्या अवैज्ञानिक बाबी या अंतर्गत बसू शकतात. त्यामुळं कोणतीही डॉक्टरी डिग्री नसताना सल्ला मसलत करणाऱ्या व्यक्तीवर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करावी, अशी मागणी अंनिस मार्फत राहुल थोरात, डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर अण्णा कडलास्कर, डॉ. अशोक कदम, मुंजाजी कांबळे, प्रकाश घादगिने, मुक्ता दाभोलकर, फारुख गवंडी प्रवीण देशमुख यांनी पत्रकात केली आहे.

हेही वाचा :

  1. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत 100 हून अधिक मोबाईल लंपास
  2. "हेच का तुमचं सर्वसामान्यांचं सरकार?"- रोहित पवार यांनी पुरावे जाहीर करत मंत्री बावनकुळेंना विचारला प्रश्न
  3. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग; फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल