नवी दिल्ली : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणासाठीचे अमेरिकेनं सर्व अडथळे दूर केल्यानंतर आज (गुरुवारी) त्याला एका विशेष विमानानं भारतात आणलं आहे.
पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असलेल्या ६४ वर्षीय राणाला लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याला भारतात आणण्यासाठी एक पथकच अमेरिकेत गेलं होतं. राणाला भारतात आणण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत सर्व कागदपत्रे आणि कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रत्यार्पणापासून वाचण्याचा शेवटचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर राणाला भारतात आणलं आहे. २६/११ हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली हा राणाशी संपर्कात होता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी, १० पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गटाने अरबी समुद्रातील समुद्री मार्गाचा वापर करून मुंबई या भारताच्या आर्थिक राजधानीत घुसून रेल्वे स्टेशन, दोन आलिशान हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर एकाचवेळी हल्ला केला होता. सुमारे ६० तास चाललेल्या या हल्ल्यात १६६ लोक ठार झाले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर आले होते.
तहव्वुर हुसेन राणा याचे प्रत्यार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे मोठे यश आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय. "तहव्वुर राणाचं प्रत्यार्पण हे पंतप्रधान मोदींच्या राजनैतिकतेचं मोठं यश आहे," असं शाह यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं की, भारताच्या सन्मानावर, भूमीवर आणि लोकांवर हल्ला करणाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. "त्याला खटला आणि शिक्षेला सामोरे जाण्यासाठी येथे आणलं जाईल. हे मोदी सरकारचं मोठं यश आहे," असंही ते म्हणाले होते. यावेळी नाव न घेता, शाह यांनी काँग्रेसवरही टीका केली आणि म्हटलं की, "२००८ मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी जे लोक सत्तेवर होते ते राणाला भारतात आणू शकले नाहीत. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक राणा हा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी आहे."
हेही वाचा :
- "तहव्वूर राणाला फाशीच द्या"; मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पीडितांची मागणी, सुरक्षेचं मोठं आव्हान
- तहव्वूर राणा प्रकरणात नरेंदर मान यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, एनआयए न्यायालयात तपास यंत्रणेची बाजू मांडणार
- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणाला आज विशेष विमानानं भारतात आणणार; अमित शाह म्हणाले, "मोदी सरकारचं..."