सांगली : सकाळी दरवाजा उघडला आणि दारातलं दृष्य पाहून संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. कारण दाराच्या समोर करणी-भानामतीचा आघोरी प्रकार करण्यात आला होता. दरवाजावर बोकडाचे मुंडके, पाय हळदीकुंकू लावून लटकवण्यात आले होते. शिवाय दारातच लिंबू, नारळ, वेगवेगळे पदार्थ, हळद-कुंकू आणि गुलाल टाकून सुई टोचलेल्या बाहुल्या ठेवण्यात आल्या होत्या. इस्लामपूर शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद झाली असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील याची दखल घेतली आहे. अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव संजय बनसोडे यांनी दिली.
काय आहे प्रकार? : इस्लामपूर शहरामधील उरुण परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या दारात अघोरी करणी-भानामतीचा धक्कादायक प्रकार करण्यात आला. एका घराच्या दारावर बकऱ्याची मुंडके आणि पाय हळदीकुंकू लावून बांधण्यात आले होते. इतकंच नव्हे तर त्या कुटुंबाच्या दारासमोर तीन नारळ त्याला काळ्या बाहुल्या बांधून त्यावर सुया टोचण्यात आल्या होत्या. तसंच कापलेले 21 लिंबू आणि त्यावर देखील पिना टोचण्यात आल्या होत्या. सोबत मिरच्या, झाडाची फांदी, पपई, कोरफडचे तुकडे अशा वस्तू ठेवून त्यावर हळद-कुंकू आणि गुलाल टाकण्यात आला होता. सकाळच्या सुमारास संबंधित कुटुंबानं घराचा दरवाजा उघडल्यानंतर दारातलं जादूटोण्याच्या बाबतचा हा सर्व आघोरी प्रकार पाहिल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. यानंतर या घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव संजय बनसोडे यांना देण्यात आली. त्यानंतर इस्लामपूर पोलिसांना देखील याची माहिती देण्यात आली. सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन करणी भानामतीसाठी करण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त करण्यात आलं आहे. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी संबंधित कुटुंबाला धीर देत कुटुंबाचं आणि लोकांचं यावेळी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.
नागरिकांशी संवाद साधून केलं प्रबोधन : याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे म्हणाले, शहरातल्या उरुण परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या दरात बोकडाचे मुंडके, पाय आणि करणीसाठी वापरले जाणारे साहित्य ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये नारळ, काळ्या बाहुल्या, सुई, लिंबू अशा गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकारमुळं परिसरात भीतीचं वातावरण होतं.अंधश्रद्धेतून हा प्रकार कोणीतरी केला आहे, अशी चर्चा सुरू होती. याबाबत आम्ही सदर कुटुंबाशी आणि आसपासच्या नागरिकांशी संवाद साधून सर्वांचं प्रबोधन केलं. अशा प्रकारामुळं कोणाचेही चांगले आणि वाईट होत नाही. त्यामुळं कोणीही घाबरून जाऊ नये. अशा घटनांच्या विरोधात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा देखील अस्तित्वात आहे. त्यामुळं जे कोणी अशा घटना करत आहेत, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. या सर्व प्रकाराबाबत सदर महिलेकडून इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तर पुढील तपास इस्लामपूर पोलीस करत असल्याचं देखील संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितलं.
टीप- (ईटीव्ही भारत कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.)
हेही वाचा -
- गुजरातने जादूटोणा विरोधी कायदा पास करणे स्वागतार्ह, राष्ट्रीय पातळीवरही कायदा करा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी - Anti Witchcraft Act
- पोलीसच अंधश्रद्धेच्या आहारी; पोलीस ठाण्याच्या गेटवरच बोकडाचा बळी देऊन बनवली बिर्याणी, घटनेवर काय म्हणाले गृहमंत्री?
- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून आरोपीसह सीबीआयला नोटीस - Narendra Dabholkar killing