ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकारातील साखरेच्या माळा बाजारामध्ये दाखल झाल्या आहेत. ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने याची विक्री देखील जोरदार सुरू आहे. यंदा कच्चा मालाच्या म्हणजे रंग, साखर, धागा आणि मनुष्यबळ महागाई वाढल्यामुळं किंमतीत वाढ झाली असली तरी देखील मागणी पण वाढली असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
बाजारात साखरेच्या माळा उपलब्ध : गुढीपाडव्यानिमित्त उभारल्या जाणाऱ्या गुढीसाठी साखरेच्या माळांचे (गाठी) महत्त्व जास्त आहे. अशातच बाजारात विविध प्रकारच्या आणि आकारातील साखरेच्या माळा उपलब्ध आहेत. खरंतर होळीनंतर येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी साखरेच्या माळांची मागणी अधिक असते.
साखरेच्या माळांची मागणी वाढली : गुढीपाडव्याच्या पूजनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये साखरेच्या माळांचा वापर केला जातो. गुढीपाडव्याकरिता पूजेच्या साहित्यामधील साखरेच्या माळेला फार महत्त्व असते. कोल्हापूर, सांगली यांसारख्या भागांमध्ये या साखरेच्या माळा प्रामुख्याने बनवल्या जातात आणि मग बाजारपेठेमध्ये त्या दाखल होतात. वाढती महागाई लक्षात घेता साखरेच्या दरात देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे या साखरेच्या माळांच्या किमतींमध्ये देखील वाढ झालेली यंदा पाहायला मिळतीये. लहान मोठ्या आकारातील वेगवेगळ्या रंगातील या माळा बाजारांमध्ये सध्या दाखल झाल्या आहेत. लाल, गुलाबी, पिवळ्या, भगव्या, पांढऱ्या अशा रंगातील माळा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. लहान-मोठ्या आकारातील या माळा असून, त्यांच्या किमती देखील त्याप्रमाणेच आहेत. वीस रुपयांपासून ते साठ रुपयांपर्यंत या माळांची किंमत आहे. धागा आणि साखर रंग यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने त्याचा परिणाम या साखरेच्या माळांच्या विक्रीच्या दरावर झाला असल्याचं विक्रेते सांगतात.

किंमतींमध्ये 10 टक्के वाढ : वाढत्या महागाईमुळं 10 टक्क्यांनी यंदा साखरेच्या माळांच्या किमतींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. मात्र, सणासुदीच्या काळात या माळांची मागणी वाढली असून, नागरिक देखील याची खरेदी करत आहेत. अनेक लहान-मोठे विक्रेते आपल्या दुकानांमध्ये या साखरेच्या माळांची विक्री करत आहेत. ग्राहक देखील आवर्जून या माळांची खरेदी करत आहेत.
हेही वाचा - सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी; गुढीपाडव्याला किंमती वाढणार?