मुंबई : हवामान बदलामुळे जगातील तापमानात सातत्यामुळे वाढ होत आहे. याचा परिणाम वातावरण आणि ऋतूंवरही होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर उष्णतेच्या लाटा आल्या. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या काळात अतिशय तीव्र लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशाच प्रकारच्या तीव्र लाटांनी जनतेला वर्ष २०२२ मध्ये छळले होते. या उष्णतेच्या लाटा कोरडी जमीन आणि वातावरणातील विशिष्ठ प्रकारच्या लाटांमध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे निर्माण झाल्याचा निष्कर्ष आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी काढला आहे. या अभ्यासातून भविष्यातील उष्णतेच्या लाटांचा अंदाज लावणे शक्य होणार असून त्यानुसार उपाययोजना करता येतील. तसेच आर्दतेच्या आधारे माहिती घेतल्यास हवामान खात्याला देखील उष्णतेच्या लाटांचे अधिक योग्य अंदाज लावता येतील.
उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र राहण्याचा धोका : आयआयटी मुंबईतील संशोधक रोशन झा आणि सह प्राध्यापिका अर्पिता मंडल यांनी यासंदर्भात एक शोधनिबंध सादर केला आहे. त्यात २०२२ मध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यातील उष्णतेच्या लाटांचे विश्लेषण आणि कारणमीमांसा केली आहे. भारतात या कालावधीत तापमान सर्वसामान्यापेक्षा ४ ते ५ अंशांनी वाढले होते. त्यामुळे उत्तर आणि मध्य भारत होरपळून निघाला होता. संशोधकांनुसार, वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे तापमान वाढले आणि उष्णतेच्या लाटांचा फटका बसला. एका उष्णतेच्या लाटेमुळे काही आठवड्यांमध्ये आणखी उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. अशा प्रकारचे एक चक्र सुरू होण्याची शक्यता असून पुढील उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र राहण्याचा धोका असू शकतो, असे प्रा. अर्पिता मंडल यांनी सांगितले.
लाटांमध्ये नेमके कारण काय? : मार्च महिन्यात वातावरणाात मोठ्या रॉस्बी लाटा निर्माण झाल्यामुळे तापमानवाढ झाली. या लाटांचा वातावरणातील दाबाशी संबंध असतो. पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यामुळे या लाटा निर्माण होतात. या लाटा आणखी तीव्र आणि मोठ्या झाल्या. त्यानंतर दोन्ही ध्रुवांच्या बाजूने विषुववृत्ताच्या दिशेने मोठी उर्जा निर्माण झाली. परिणाम मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटांचा फटका बसला. तर एप्रिल महिन्यातील लाटा या मार्च महिन्यातील लाटांचाच परिणाम होता, असे अर्पिता मंडल यांनी सांगितले. तसेच, मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटामुळे जमिनीतील आर्दता पूर्णपणे शोषून घेतली गेली. त्यामुळे जमीन कोरडी झाली. त्यातच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून आलेल्या उष्ण वाऱ्यांचीही भर पडली, असे अर्पिता मंडल म्हणाल्या.
जमीन कोरडी होणे कशाचे संकेत? : जमीनीत आर्दता असल्यास कडक उन असले तरी तापमान खूप वाढत नाही. परंतु, आर्दतेच्या अभावामुळे जमीन तापते, त्याताच सूर्यदेखील आग ओकत असतो. त्यामुळे वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणावर वाढते. याचा परिणाम मान्सूनवरही होतो. तसेच अशा प्रकारच्या उष्णतेच्या लाटांची संख्या कमी असल्यास जमिनीतील आर्दतेवर परिणाम होतो आणि पूर्वमोसमी पावसावर त्याचा नकरात्मक परिणाम होतो, असे अर्पिता मंडल यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितले. तसेच, २०२२मध्ये उच्च तापमान, या तापमानांचे दिवस इत्यादी आधारे आकडेवारी गोळा करण्यात आली आणि त्यानंतर उष्णतेच्या लाटांचा अभ्यास करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.
उष्णतेच्या लाटांचा अंदाज लावणे शक्य : हवामान बदलामुळे पृथ्वीवरील सरासरी तापमान वाढणार आहेच. वातावरणातील या बदलांना समजून घेतल्यास अशा प्रकारच्या तीव्र उष्णतेच्या लाटांचा अंदाज लावणे सोपे होईल आणि त्यासाठी पूर्वतयारीदेखील करण्यात मदत होईल, असेही अर्पिता मंडल यांनी सांगितले.
हेही वाचा :