मुंबई - शिवसेना ठाकरे पक्षातील अनेक नेते आमच्या संर्पकात असून, संजय राऊत यांच्या बडबडीमुळे त्यांच्या पक्षात कोण राहात नाही. त्यांच्या बडबडीमुळे पक्ष रसातळाला जात आहे आणि त्यांचा पक्ष जमीनदोस्त होईल, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर केली होती. यावर बोलताना राऊत म्हणाले की, मंत्री गिरीश महाजन यांच्या दहा पिढ्या आल्या तरी पक्ष संपणार नाही. महाजन हे भाजपाचे दलाल आहेत, असं प्रतित्तर दिलं होतं. यावर आज पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
उद्धवजी तुम्हांला लखलाभ - मंत्री गिरीश महाजन राऊतांच्या टिकेवर बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांची जर बडबड नाही थांबवली तर त्यांचा पक्ष जमीनदोस्त होण्यास वेळ लागणार नाही. राऊतांच्या बडबडीमुळं त्यांच्या पक्षात त्यांचेच नेते नाराज आहेत. त्यामुळं पक्षातील लोक त्यांना सोडून जाताहेत. शिवसेना संपवण्याचे काम, शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं. त्यामुळं उद्धवजी संजय राऊत यांना आवर घाला, नाहीतर तुमचा पक्ष तुम्हाला लखलाभ असो, सल्ला देत मंत्री महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले.
मी गेली 35 वर्षे निवडून येतोय - सत्ता गेल्यावर गिरीश महाजन हे भाजपा पक्ष सोडून जातील, या राऊत यांच्या टिकेवर बोलताना महाजन म्हणाले की, मी पक्षाचा पाईक आहे. संघाचा कार्यकर्ता आहे. लहानपणापासून मी संघासाठी काम करतोय. गेली 35 वर्ष मी आमदार आहे. लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळं पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा माझ्या मनात येणार नाही. तुम्ही पक्ष रसातळाला नेऊन तुम्ही दलाली केला. दलालीचा विषय काढायचा तर गोरेगावमधील पत्राचाळीत कोणी दलाली केले हे सर्वांना माहीत आहे. आम्हाला बोलायला लावू नका. बाळासाहेबांच्या विचारांना आणि हिंदुत्वाला तुम्ही तिलांजली दिली. उद्धवजींना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसवलं. संजय राऊत यांच्या बडबडीमुळं उद्धवजींना आणि शिवसेनेला तुम्ही संपवले आहे. तुमची ही अशीच बडबड सुरु राहिली तर, तुमचा पक्ष जमीनदोस्त राहिल्याशिवाय राहणार नाही, असं महाजन म्हणाले.
त्यांना दुष्मनाची गरजच नाही - आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते एका विचाराने प्रेरित होऊन पक्षासाठी काम करत आहेत. सत्ता असो किंवा नसो मी भाजपसाठीच काम करणार, मी कुठेही जाणार नाही. दरम्यान, त्यांच्या पक्षातील फक्त सुधाकर बडगुजरच नाराज आहेत असे नाहीतर राज्यातील अनेक ठाकरे गटातील नेते आमच्या संपर्कात आहेत. संजय राऊत यांच्यासारखे लोक असताना दुसऱ्या कुठल्याही दुष्मनाची त्यांना गरजच नाही. त्यांचेच लोक त्यांचा पक्ष संपवण्यासाठी पुरेसे आहेत. तेच काम संजय राऊत करत आहेत. एकनाथ खडसेंची मानसिक स्थिती चांगली नाही. ते फार उद्विग्न आहेत. एका महिलेच्या मृत्यू प्रकरणात एकनाथ खडसेंचा भाचा सात वर्ष तुरुंगात गेला होता. तेच माझ्यावर आरोप करताहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांचं डोकं तपासण्याची वेळ आली आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला.
हेही वाचा...