पुणे : राज्यात 10 वीच्या निकालात (SSC Result 2025) यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात तब्बल 211 विद्यार्थ्यांना शंभर पैकी 100 गुण मिळाले आहेत. दहावीमध्ये यश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. शिक्षण हे खऱ्या आयुष्याला समृद्ध करतं आणि यामुळं माणसाच्या आयुष्यात बदल होतात, ही बाब लक्षात घेत पुणे महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या 'प्रियांका कांबळे' (Priyanka kamble) हिनं देखील दहावीची परीक्षा देत घवघवीत यश प्राप्त केलंय.
9 विद्यार्थिनी उत्तीर्ण : श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल सेवासदनचा निकाल 90 टक्के इतका लागला आहे. एकूण 10 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 9 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. ज्यात सुकन्या शिंदे हिनं 70.40 टक्के गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलाय. तर रेणुका कत्राबाद हिनं 65.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय. प्रशालेमधून इयत्ता 10 वीच्या परीक्षेस बसलेल्या सर्वच विद्यार्थीनींनी अतिशय मेहनतीनं आणि कष्टानं हे यश संपादित केलंय. यात अभिमानाची गोष्ट म्हणजे 'प्रियांका कांबळे' जी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते, तिनं स्वच्छतेचं काम, शाळा, अभ्यास तसेच संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून दहावीच्या परीक्षेत 47.60 टक्के मिळवले आहेत.
काम करत घेतलं शिक्षण : याबाबत प्रियांका कांबळे म्हणाली की, "लहान असताना मी शिक्षण सोडून दिलं होतं. तेव्हा शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे कळलं नव्हतं. मात्र, जसं जसं मोठं होत गेले तेव्हा शिक्षणाचं महत्त्व कळालं. असं म्हणतात शिक्षणाला कोणतंही वय नसतं आणि हीच बाब लक्षात घेत मी शिक्षण घेण्याचा विचार केला आणि श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल येथे आठवीपासून शिक्षण घ्यायला सुरुवात केली. मी महापालिकेत कात्रज परिसरात स्वच्छतेचं काम करते. हे काम करून मी शिक्षण पूर्ण केलं आहे. सकाळी परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन कचरा गोळा करून, मुलाला शाळेत सोडून मी माझ्या शाळेत जात होते. दहावीच्या परीक्षेला देखील मी कामावर जाऊन परीक्षेला जात होते. या काळात मला माझ्या आईने मदत केली. पास झाल्यानं मला खूपच आनंद होत आहे," असं यावेळी प्रियांका कांबळे हिनं सांगितलं.
प्रौढ स्त्री शिक्षणाचं कार्य : याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम खोमणे म्हणाल्या की, "श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्रियांचं हायस्कूल ही पुण्यात मध्यवस्तीत भरणारी शाळा आहे. या शाळेत प्रौढ महिलांना शिक्षण दिलं जाते. २० व्या शतकात स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या रमाबाई रानडे यांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी २ ऑक्टोबर १९०९ रोजी पुणे सेवासदन संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून प्रौढ स्त्री शिक्षणाचं कार्य चालू आहे. २०२२ साली प्रौढ माध्यमिक शाळा म्हणून या शाखेला सरकारी मान्यता मिळून ५० वर्षे पूर्ण झाली. पण प्रौढ स्त्रियांना साक्षर करण्याचं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम करण्याचं कार्य अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे सेवासदन संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत चालू आहे आणि चालू राहील. शिक्षणाची संधी न मिळालेल्या किंवा अर्ध्यावर शिक्षण सुटलेल्या अनेक मुली, महिला श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कुलमध्ये शासनमान्य अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेऊ शकतात. येथे ५ वी - ६ वी एकत्र आणि ७ वी आणि ८ वी एकत्र असा अभ्यास घेतला जातो. ९ वी आणि १० वीचे स्वतंत्र वर्ग घेतले जातात. त्यामुळं विद्यार्थिनींची दोन वर्षे वाचतात. इयत्ता १० वीची परीक्षा दिल्यावर आमच्या विद्यार्थिनी विविध अभ्यासक्रम, व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की, आमच्या प्रशालेचा या वर्षीचा १० वीचा निकाल हा चांगला लागला आहे".
हेही वाचा -