मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते. अखेर मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देखील मिळाला. मात्र, असं असताना महाराष्ट्रात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आलेले अनेक परप्रांतीय मराठी भाषेचा अनादर करताना दिसून येतायेत. अशीच घटना वर्सोवा येथे घडली असून, मुजोर परप्रांतीय व्यक्तीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्याची घटना समोर आली. दरम्यान, यावर मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली असून बाहेरून येऊन मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अनादर करणं, हे प्रकार कदापि सहन केलं जाणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं उदय सामंत यांनी म्हटलंय.
मराठी भाषेचा आदर केलाच पाहिजे : उदय सामंत यांनी सांगितलं की, "अशा घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. काही जण प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी देखील करतायेत. मात्र, अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत मी सर्व पोलीस अधिकारी, कलेक्टर आणि इतर अधिकारी सर्वांची बैठक घेणार आहे. या बैठकीत जिथे अशा प्रकारचे प्रकार घडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. तसंच मराठी भाषेचा आदर केलाच पाहिजे. मराठी भाषा विभागाकडून ही कारवाई केली जाईल. बाहेरून येऊन मराठी भाषेचे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणं किंवा मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अनादर करणं, हे प्रकार कदापि सहन केले जाणार नाहीत. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल." अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.
डीमार्टमधील कर्मचाऱ्याची उर्मट भाषा : दरम्यान, मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील वर्सोवा येथील डी मार्ट स्टोअरमध्ये मराठी भाषेवरून ग्राहक आणि स्टोअर कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. डी मार्टमध्ये एक मराठी ग्राहक गेला होता. त्या ग्राहकानं संबंधित डीमार्टमधील कर्मचाऱ्याला मराठीत बोलण्याची विनंती केली. मात्र, त्या ग्राहकाला न जुमानता डीमार्टमधील कर्मचाऱ्यानं "मी मराठीत बोलणार नाही. तुला काय करायचं ते कर. तुला त्याचा काही त्रास होत आहे का?" अशी उर्मट भाषा वापरली. ज्या मराठी ग्राहकासोबत हा प्रकार घडला. तो ग्राहक मनसेच्या कार्यकर्ता आहे. त्यानं सर्व घडला प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि त्याची तक्रार मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी विचारला जाब : यानंतर, सदर घटनेची माहिती मिळताच वर्सोव्याचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी थेट डीमार्ट स्टोअर गाठले. संदेश देसाई यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह डीमार्ट स्टोअरला भेट दिली. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्याला जाब विचारला. त्यावेळी त्यानं देसाई यांच्याशी देखील उद्धटपणे भाष्य केलं. त्यामुळं संपलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर मुजोर कर्मचाऱ्याच्या कानाखाली 'जय महाराष्ट्र’ काढला. तसंच "महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय लोकांनी मराठी भाषेचा आदर केलाच पाहिजे तुम्हाला महाराष्ट्रात येऊन मराठी बोलता येत नसेल तर मराठी शिका. यापुढे मराठीचा असा अनादर सहन केला जाणार नाही", असं संदेश देसाई ठामपणे सांगितलं.
याआधाही परप्रांतीय लोकांची मुजोरी : दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एअरटेल कार्यालयातील एका कर्मचारी महिलेनं मराठी बोलण्यास नकार देत ग्राहकाशी गैरव्यवहार केला होता. त्यावेळी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सदर महिलेच्या कानाखाली जय महाराष्ट्र काढला होता. ही झाली ताजी घटना. डिसेंबर महिन्याचा विचार केला तर डिसेंबर महिन्यात अशा प्रकारच्या दोन घटना समोर आल्या. एक म्हणजे कल्याण येथे एका परप्रांतीय शुक्ला नामक कुटुंबानं मराठी कुटुंबाला केलेली मारहाण असेल, तर दुसरी घटना म्हणजे मुंबईतील मराठी माणसाच सांस्कृतिक केंद्र मानले जाणाऱ्या गिरगावातील एका मराठी महिलेला एका मारवाडी व्यक्तीनं मारवाडीमध्ये बोलण्याचा केलेला आग्रह असेल. त्या सर्व प्रकरणात महाराष्ट्र निर्माण सेनेनं मुजोर परप्रांतीय व्यक्तींच्या कानाखाली 'जय महाराष्ट्र' काढला होता. मात्र या घटना अजूनही थांबलेल्या नाहीत.
मुंबईत मराठीतच बोलायला पाहिजे : यासंदर्भात आम्ही गिरगाव येथील रहिवासी कपिल घायवट यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की, आम्ही अनेक वर्ष मुंबईत राहत आहोत. परप्रांतीय लोकांना आम्ही हिंदीत बोलून सहकार्य करतो. मात्र, जेव्हा आम्ही मराठीत बोलतो, त्यावेळी ते मराठीत बोलवण्याचं सौजन्य दाखवत नाहीत. त्यावेळी ते आपला मुजोरपणा दाखवतात. आपण एखाद्या रिक्षात बसतो, त्यावेळी देखील त्याच्याशी सुरुवातच आपण हिंदीत बोलण्यापासून करतो. हे आपल्या लोकांनी देखील आता बदलायला हवं. सर्व लोकांनी मुंबईकरांनी मुंबईत मराठीतच बोलायला सुरुवात केली पाहिजे."
... तर एकमेकाला सहकार्य करायला हवं : दुसरीकडं, यासंदर्भात कुलाबा येथील किराणा मालाचे व्यापारी रोहित कदम यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की, आम्ही मराठी आहोत. आम्ही आमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांशी मराठीतच बोलतो. मात्र, दुकानात काम करण्यासाठी अनेकदा मराठी तरुण मिळत नाहीत. ते दुकानात काम करायला लागतात. अशा वेळी एखाद्या परप्रांतीय माणूस बघून तो कामाला ठेवावा लागतो. अनेकदा दुकानात काम करणारा परप्रांतीय माणूस हा नवीनच गावावरून आलेला असतो. त्याला आपली मराठी भाषा कळत किंवा नाही त्याला बोलता येत नाही. अशावेळी आपण देखील एकमेकाला सहकार्य करायला हवं."
हेही वाचा :
- अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; विरोधी पक्षनेतेपदाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...
- "महाराष्ट्राचा जीडीपी देशात सर्वात जास्त, विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव उथळ", विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचं उत्तर!
- "वारंवार खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार का?", सुषमा अंधारेंची सरकारवर टीका