मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी. तसंच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बुधवारी भेट घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांना देखील पत्र देऊन या प्रकाराची उच्च न्यायालयाने स्यु मोटो दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
विष्णू चाटेची लातूर कारागृहात रवानगी : बीडमधील घटनेप्रमाणे राज्याच्या विविध जिल्ह्यात असे प्रकार घडत आहेत. गुंडगिरी प्रवृत्तीच्या व्यक्तींना सोबत घेऊन जिल्ह्यामध्ये नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप दमानिया यांनी केला. या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याच्या मागणीप्रमाणे लातूर कारागृहात रवानगी केली. त्या कारागृहात त्याचे आठ मर्जीतले अधिकारी कार्यरत आहेत, ही गंभीर बाब आहे. हे प्रकार तातडीनं थांबवण्याची गरज आहे, असं दमानिया म्हणाल्या.
आरोपींना ऑर्थर रोड किंवा येरवडामध्ये पाठवा : या आरोपींची रवानगी मुंबईतील ऑर्थर रोड कारागृह किंवा पुण्यातील येरवडा कारागृहात करण्याची गरज दमानिया यांनी व्यक्त केली. त्या आरोपींना त्यांच्या मर्जीप्रमाणे तुरुंग देण्याच्या कृतीला दमानिया यांनी पोलीस महासंचालकांच्या बैठकीत आक्षेप नोंदवला. त्यांना मुंबई किंवा पुण्यातील तुरुंगात हलवावे, अशी मागणी दमानिया यांनी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना दमानिया यांनी पत्र दिलं आहे. या प्रकाराची स्यु मोटो याचिका म्हणून दाखल करावी, अशी मागणी त्यांच्याकडं केली आहे. राज्यात सध्या पालकमंत्री पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील राजा बनून तेथील सर्व यंत्रणा नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री पदावरुन सध्या होत असलेले प्रकार हे केवळ सत्तेसाठी आहेत, लोकसेवा हा त्यामध्ये अजिबात विचार नाही, असं दमानिया म्हणाल्या.
बीडमधील चौकशी आणि खटला मुंबईत हलवा : या प्रकरणाची चौकशी आणि त्याचा खटला मुंबईत चालवावा, दर आठवड्याला त्यावर न्यायालयातर्फे देखरेख ठेवावी. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याची माहिती दिल्यानं शंका निर्माण होत आहे. या प्रकरणाची चौकशी न्यायालयाच्या नियंत्रणाखाली दर आठवड्याला व्हावी, वाल्मिक कराडची संपत्ती आणि त्याच्या पत्नीच्या कंपनीच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी दमानिया यांनी केली.
संपत्तीची चौकशी करावी : धनंजय मुंडे यांच्या अनेक कंपन्यांची माहिती आपण पोलीस महासंचालक आणि मुख्य न्यायमूर्तींना दिली आहे. ईडी, आयकर विभागानं या संपत्तीची चौकशी करावी. त्यांच्या एका कंपनीला कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळालं आहे, ते कसं मिळालं, कशाच्या बदल्यात मिळालं याची चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केली. राजकारण्यांकडून कठोरात कठोर शिक्षेचा दावा केला जात असला तरी काल व्हिडिओ आल्यानंतर त्याची चौकशी होण्यापूर्वीच त्यांना न्यायालयीन कोठडीत हलवण्यात आलं. आजाराचं निमित्त करुन वैद्यकीय जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी शंका त्यांनी दमानिया यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -