नंदुरबार - जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं स्मार्ट पहारा (Smart patrolling) म्हणजेच स्मार्ट ई-बिट सिस्टीम सिस्टीम प्रणाली लागू केली आहे. शहरात वाढत्या घरफोड्यांसह कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रभावी पाऊल उचलण्यासाठी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस. यांच्या संकल्पनेतून 'स्मार्ट ई-बिट सिस्टीम' पेट्रोलिंगला (Smart E beat system) सुरुवात करण्यात आली आहे.
'ई-बिट सिस्टीम'साठी जिल्ह्यात ७१३ पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रणालीच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या स्थळांना भेट द्यायची आहे, हे समजणार आहे. तसेच प्रत्येक स्थळासाठी १० मिनिटे थांबणं बंधनकारक असणार आहे. यामध्ये शहरातील संवेदनशील ठिकाणांसह बँक, एटीएम, सराफा बाजार, बाजारपेठ यासह महत्वाच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सर्व अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या प्रणालीतंर्गत प्रत्येक बीट मार्शलकडे मोबाईल डिव्हॉईस देण्यात आले आहेत. त्या माध्यमातून त्यांची प्रत्येक हालचाल पोलीस नियंत्रण कक्षाकडून थेट ट्रॅक करता येणार आहे. कोणत्या भागात किती वेळ गस्त घातली गेली? कोण-कोणत्या ठिकाणी थांबले? कोणाशी संवाद साधला, अशी माहिती डाटा स्वरुपात साठविली जाणार आहे.
नंदुरबार पोलीस दलाच्या वतीनं 'स्मार्ट ई-बीट सिस्टीम' सुरू करण्यात आली आहे. घरफोड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. आपल्या भागात पेट्रोलिंग होत नसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. सध्या जिल्ह्यात ७१३ स्मार्ट पेट्रोलिंगसाठीचे पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. यात आणखी वाढ करण्यात येईल. जेणेकरून गुन्हेगारी व घरफोड्यांचे प्रमाण कमी करण्यात पोलिसांना यश येईल- श्रवण दत्त, जिल्हा पोलीस अधीक्षक
'स्मार्ट ई-बीट सिस्टीम' अशा पद्धतीनं काम करेल?'स्मार्ट ई-बीट सिस्टीम' एक मोबाईल ॲप आधारित प्रणाली असून त्यामध्ये बीटवरील पोलीस अधिकारी ठराविक वेळेनुसार आपली उपस्थिती नोंदविणार आहेत. त्यांचे लोकेशन, गस्त करण्याची वेळ, नागरिकांशी संवाद, संवेदनशील ठिकाणांवरील हजेरी आदी माहिती या प्रणालीत नोंदविली जाणार आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येक बीटवर काय कार्यवाही होते, याचा थेट आढावा घेता येणं शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे यात पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याची कामगिरीदेखील समजते. एखाद्यानं पेट्रोलिंगकडं दुर्लक्ष केल्यास त्याची जबाबदारी निश्चित करता येते.
घर बंद असल्यास पोलिसांना माहिती कळवा- सुट्टीनिमित्त अथवा कार्यक्रमानिमित्त एखादे कुटुंब घराबाहेर जात असेल तर त्यांनी घर बंद असल्याबाबतच्या ठिकाणाला तात्पुरत्या स्वरुपात यामध्ये समाविष्ट करता येणार आहे. यामुळे त्या भागात पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्या घरापर्यंत भेट देता येणार आहे. यामुळे घरफोड्यांवर नियंत्रण आणण्यास मदत होणार आहे.
'स्मार्ट ई-बीट सिस्टीम' मुळे गस्त घालणं होईल सोपे- 'स्मार्ट ई-बीट सिस्टीम' मुळे पेट्रोलिंगवरील कर्मचारी हलगर्जीपणा करू शकत नाही. कारण, सर्व हालचाली ट्रॅक होतात. नागरिकांच्या तक्रारी वेळीच नोंदविल्या जाऊन कारवाई शक्य होते. संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवता येते. तसेच बंद घरे, वर्दळ नसलेले भाग आणि रात्रीच्या वेळेतील हालचालींवर विशेष लक्ष ठेवता येईल. पोलिसांची कार्यक्षमता वाढून गुन्हेगारीवर नियंत्रण येईल. यामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढणार आहे.