पुणे : भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक्सियम-4 (Axiom 4) मिशन अंतर्गत ते इतर 4 जणांसोबत अंतराळात जातील. विशेष म्हणजे, अंतराळात जाणारे शुभांशू शुक्ला हे केवळ दुसरे भारतीय ठरणार आहेत. शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ई टीव्ही भारतनं खगोल अभ्यासक डॉ. लीना बोकील यांच्याशी बातचीत केली. त्यांनी या मोहिमेविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
भारतासाठी खूपच महत्त्वाची मोहीम - शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरेच भारतीय अंतराळवीर असणार आहेत. सोबतच, ही मोहीम भारतासाठी खूपच महत्त्वाची असल्याचं खगोल अभ्यासक डॉ. लीना बोकील यांनी सांगितलं.
अंतराळात कोणते प्रयोग होणार? - या मोहिमेबद्दल बोलताना बोकील म्हणाल्या, "या मोहिमेला एक्सियम-4 असं नाव देण्यात आलं आहे. अमेरिकन कंपनी एक्सियम स्पेस ही नासा आणि स्पेसएक्स यांच्या साथीनं ही मोहीम पार पाडत आहे. यात 4 अंतराळवीर बसून स्पेसमध्ये जाणार आहेत. चौघंजण 28 तासांनंतर इंटरनॅशन स्पेस सेंटरला पोहोचतील. यानंतर अंतराळात त्यांच्या प्रयोगांना सुरुवात होईल. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांचे यामध्ये मसल लॉस किंवा मसल ऍक्ट्रॉपी, तसेच, मोबाईल आणि लॅपटॉप यांच्या स्क्रीन टाईमचा परिणाम मानवी मेंदूवर होतो का? मायक्रोग्रॅव्हिटीचा परिणाम पिकांवर होतो का? असे अनेक प्रकारचे प्रयोग तिथं करण्यात येणार आहेत. हे अंतराळवीर 2 ते 3 आठवड्यांसाठी अंतराळात असतील".
या मोहिमेद्वारे 40 वर्षानंतर एखादी भारतीय व्यक्ती अंतराळात जाणार आहे. 40 वर्षांपूर्वी म्हणजेच, 1984 ला राकेश शर्मा हे अंतराळात गेले होते. दरम्यान, याआधी या मोहिमेला 8 जून रोजी सुरुवात होणार होती. मात्र, खराब हवामानामुळे ती 11 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा काही तांत्रिक अडचणींमुळे हे अभियान पुढे ढकलण्यात आलं आहे.