लेकीला बनायचं होतं डॉक्टर, दिवंगत वडिलांच्या इच्छेसाठी बनली बॉक्सर, आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रुतीनं गाजवलं नाव
दिवंगत वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रुतीनं डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यागून बॉक्सरची वाट निवडली. तिनं हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांची कमाई केली.

Published : October 12, 2025 at 3:33 PM IST
|Updated : October 12, 2025 at 8:53 PM IST
नांदेड : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नांदेड शहरातील श्रुतीनं आपल्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नावर पाणी फिरवलं. श्रुतीनं बॉक्सर व्हावं, असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी श्रुतीनं बॉक्सिंगचा खडतर प्रवास स्वीकारला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी श्रुतीनं बॉक्सिंगच्या रिंगमध्ये पाय ठेवत बॉक्सिंगचे धडे गिरवायला सुरूवात केली. तिच्या या खडतर प्रवासाचा 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी संघरत्न पवार यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट....
श्रुतीची संघर्षमय कहाणी : मोठं झाल्यावर डॉक्टर, इंजिनिअर, फार्मासारख्या क्षेत्रात करियर करण्याची अनेकांची इच्छा असते. अनेक पालकांचीही तशीच इच्छा, स्वप्न असतात. इतर क्षेत्राकडं वळण्याचा कल मात्र खूप कमी असल्याचं दिसून येतं. नांदेडच्या श्रुतीनंही असंच काहीसं स्वप्न बघितलं होतं. तिला मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचं होतं. तशी तयारीही तिनं सुरू केली होती. मात्र, तिच्या वडिलांची वेगळीच स्वप्न होती. तिनं बॉक्सिंग क्षेत्रात करियर करावं, असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. मात्र, तिच्या वडिलांचं निधन झालं. या धक्क्यातून सावरुन तिनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीनं मेहनत करण्यास सुरुवात केली. आज त्यात ती यशस्वी झाली. बॉक्सिंगच्या खडतर प्रवासात श्रुतीनं आतापर्यंत जिल्हास्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई केलीय. तिनं दिल्लीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. या कामगिरीमुळं श्रुतीवर कौतुकाचा वर्षाव होतोय.
श्रुती मेंडकेकरचा मोठा संघर्ष : मेंडकेकर कुटुंबीय नांदेड शहरातील खडकपुरा परिसरात राहतात. श्रुतीचे दिवंगत वडील रत्नाकर मेंडकेकर हे ट्रॅक्टरच्या एका खासगी गॅरजमध्ये काम करत होते. त्यांना दोन मुली आहेत, एक श्रुती आणि दुसरी श्रीशा. या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची जबाबदारी ते पार पाडत होते. लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न श्रुतीनं बघितलं होतं. तशी इच्छाही तिनं आपल्या वडिलांना बोलून दाखवली होती.

वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण : आपली मुलगी सक्षम झाली पाहिजे, स्वत:च्या पायावर उभारली पाहिजे. तसंच स्वत:चं रक्षण करत आपल्या बहिणीचं रक्षण केलं पाहिजे, अशी वडिलांची इच्छा होती. या उद्देशानं श्रुतीचे वडील रत्नाकर मेंडकेकर यांनी शहरातील 'ब्लेंज कॉम्बॅक्ट फिटनेस सेंटर'मध्ये वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी बॉक्सिंग शिकवण्यासाठी पाठवलं. फिटनेस सेंटरचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक किरण गवळी व दीपा गवळी यांनी श्रुतीला बॉक्सिंगमधला 'कॉम्बॅक्ट किक बॉक्सिंग' हा प्रकार शिकवला. श्रुतीनेही संघर्ष करत बॉक्सिंगची कला आत्मसात केली. तिनं जिल्हास्तरीय स्पर्धांपासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली बॉक्सिंगमधलं कौशल्य सर्वांना दाखवलं.

भारतासाठी ऑलिंम्पिकमध्ये पदक जिंकण्याची इच्छा : श्रुतीनं आपल्या कौशल्याच्या जोरावर आतापर्यंत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट केलीय. दिल्लीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत श्रुतीनं दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावलं. भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असून, देशासाठी पदक जिंकण्याची इच्छा तिनं 'ईटीव्ही भारत'कडं बोलून दाखवली.

श्रुतीच्या घरची दयनीय अवस्था : श्रुतीची आई अश्विनी रत्नाकर मेंडकेकर या आपल्या दोन्ही मुली, सासूचा सांभाळ करण्यासाठी घरगुती काम करतात. "श्रुतीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा खर्च उचलण्याची घरची परिस्थिती नाही. त्यामुळं सामाजिक संघटना तसंच सरकारच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी," अशी विनंती श्रुतीची आई अश्विनी मेंडकेकर यांनी केली. श्रुतीची बहीण श्रीशा मेंडकेकर ही डीएडच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. तिच्या शिक्षणाचा खर्चदेखील मोठा आहे. "घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं श्रुतीला पुढील सामने खेळण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे," असं श्रुतीची बहीण श्रीशानं सांगितलं. "आम्ही वेळोवेळी मदत केल्यामुळंच श्रुती इथपर्यंत पोहोचली. यापुढं देखील श्रुतीला योग्य ती मदत करेन, पण सरकारच्या वतीनं उत्कृष्ट खेळाडूंना सहकार्य मिळावं," अशी मागणी श्रुतीच्या कोच दीपा गवळी यांनी केली.
हेही वाचा :
- कुंचल्यातून कॅनव्हासवर रेखाटलेल्या दुर्मीळ चित्रांचा प्रचार अन् प्रसार; कीर्ती गायकवाडांकडून नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न
- विद्यार्थ्यांनी तयार केले सुगंधी उटणे; कोंडीवते जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम, पाहा व्हिडिओ
- ई-केवायसीसाठी आदिवासी परिसरातील 'लाडक्या बहिणी' चढल्या डोंगरावर; योजनेचा लाभ घेणं ठरतंय आव्हान"

