अहिल्यानगर : श्रीरामपूर एमआयडीसीमधून अल्प्राझोलम हा अमली पदार्थ आणि त्याच्यासाठी लागणारा कच्चामाल पोलिसांनी जप्त केलाय. तसेच मालाची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला अटक करण्यात आल्याची माहिती, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
टेम्पोमध्ये आढळल्या पांढऱ्या रंगाच्या 21 गोण्या : श्रीरामपूर शहराला लागून असलेल्या एमआयडीसी परिसरात टेम्पोमधून अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिघी खंडाळा रोडवर (एमएच 20 बीटी 0951) या टेम्पोची तपासणी केली असता, त्यात त्यांना पांढऱ्या रंगाच्या 21 गोण्या दिसून आल्या. त्यापैकी 14 गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि उर्वरीत 7 गोण्यामध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटीक आढळून आले. वाहनचालक मिनीनाथ राशीनकर यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यानं सदरचं स्फटीक हे अल्प्राझोलम औषधाचे असून गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनविण्याकरीता लागणारा कच्चा माल असल्याचं सांगितलं.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : अल्प्राझोलम हा अमली पदार्थ असल्यानं अहिल्यानगर येथील फॉरेन्सीक तज्ञांनी तपासणी केल्यानंतर प्रथमदर्शनी सदरचे स्फटीक हे अल्प्राझोलम हा अमलीपदार्थ आणि पावडर ही अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचं सिध्द झालं. त्यामुळ हा मोठा साठा पोलिसांना जप्त केला असून हा माल विश्वानाथ कारभारी शिपनकर (रा. दौड, जि. पुणे) याने दिला असल्याचं मिनीनाथनं सांगितलं. अल्प्राझोलम हा अमली पदार्थ असल्यानं आणि आरोपीच्या ताब्यात तो व्यावसायिक वापराकरता मोठ्या प्रमाणावर मिळून आल्यानं आरोपी मिनीनाथ विष्णु राशीनकर, (वय 38 वर्षे, रा. धनगरवाडी ता. राहता जि. अहिल्यानगर) 2) विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा. दौड जि. पुणे याने एम.आय.डी.सी. श्रीरामपूर) यांच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात मिनीनाथ विष्णु राशीनकरला अटक करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.
हेही वाचा -
- किराणा दुकानातून अमली पदार्थांची विक्री; दोन विक्रेत्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, साडेचार कोटींचं ड्रग जप्त - Mephedrone MD drug seized in Thane
- गोवा एनसीबीकडून आंतरराज्य तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश, नायजेरियाच्या मुख्य सूत्रधाराला पत्नीसह अटक - Goa NCB
- कोल्हापूर परिक्षेत्रात आचारसंहिता काळात सापडलं २० कोटींचं घबाड; रोख रक्कम, दागिने जप्त