मुंबई : गिरगाव येथे काही महिन्यापूर्वी एका कंपनीत मराठी माणसाला नोकरी देण्यात येणार नाही, अशी जाहिरात देण्यात आली होती. तर डोंबिवलीमध्येही एका सोसायटीत मराठी हिंदी भाषेवरुन वाद झाला होता आणि मराठी माणसाला हाणामारी करण्यात आली. या दोन घटना ताज्या असताना आता पुन्हा एकदा मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे एका शोरूममध्ये मराठी बोलण्यावरुन वाद झाल्याची घटना घडली. यावरुन ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून, याचा जाब विचारत शोरूममधल्या मॅनेजरला माफी मागायला लावली.
नेमकं काय घडला प्रकार? : शुक्रवारी गिरगावमधील एक मराठी कुटुंब क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी गेले असता, ते मराठीत बोलले. परंतु तेथील मॅनेजरने तुम्ही मराठीत बोलू नका हिंदी किंवा गुजराती भाषेत बोला असं म्हटलं. यावरुन तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनीही मराठी कुटुंबाची खिल्ली उडवली. घडलेला सर्व प्रकार मराठी कुटुंबाने शिवसेनेचे गिरगावतील विभागप्रमुख संतोष शिंदे यांना सांगितला. हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याचं पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी ते शोरुममध्ये गेले. त्यानी शोरूमच्या मॅनेजरला मराठीत माफी मागायला भाग पाडलं.
मराठीवरुन सरकारची उदासीनता : मराठी भाषेवरुन किंवा मराठी माणसाच्या नोकरीवरुन महाराष्ट्रातील मुंबईतच हे असं घडत आहे आणि हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच सरकार एकीकडं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत आहे. परंतु जी मराठी भाषेला आणि मराठी माणसाला दुय्यम वागणूक दिली जाते. दुसरीकडं मुंबई, महाराष्ट्रात येऊन परप्रांतीय हिंदी आणि गुजराती भाषेसाठी अट्टाहास करतात. अशांना धडा शिकवण्याची गरज आहे. या महाराष्ट्रात मुंबईत पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्रसारखा लढा देण्याची गरज आली आहे. तसेच मुंबईत इमारतीमध्ये 25 टक्के मराठी माणसाला आरक्षण दिलं पाहिजे. याबाबतचा जीआर सरकारनं काढला पाहिजे, अशी मागणी ही संतोष शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा -
- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं विविध पुरस्कार जाहीर, वाचा संपूर्ण यादी
- Maharashtra Budget Session 2023 : मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पंतप्रधानांना भेटणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही
- Elite Status for Marathi: मुख्यमंत्र्यांच्या पत्राला पंतप्रधानांकडून वाटाण्याच्या अक्षता; अभिजात दर्जापासून मराठी भाषा वंचित