ETV Bharat / state

दोन शिवसेना दोन वर्धापन दिन! बाळासाहेबांची शिवसेना 59 वर्षांची झाली पण…; कसा आहे शिवसेनेचा इतिहास? वाचा सविस्तर...

दोन शिवसेना आणि दोन वर्धापन दिन... शिवसेनेचा आजवरचा इतिहास काय आहे? त्यासंदर्भात पाहूया....

Eknath Shinde, Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 18, 2025 at 7:26 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना केली. आज शिवसेना या संघटनेला 59 वर्ष पूर्ण होतायेत. या 59 वर्षांत शिवसेनेनं अनेक संकटं, अनेक वादळी वारे झेलले. तसंच अनेक मोठ्या दिग्गजांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून दुसरा मार्ग स्वीकारला. या 59 वर्षांत बरंच पुलाखालून पाणी गेलंय. परंतु जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं. ते ऐतिहासिक आणि शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड होतं. त्यामुळं सध्या शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेनेचा वर्धापन दिन एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या गटांकडून साजरा होणार आहे. म्हणजे दोन शिवसेना आणि दोन वर्धापन दिन. तर शिवसेनेचा आजवरचा इतिहास काय आहे? त्यासंदर्भात पाहूया....

पहिला दसरा मेळावा कधी झाला? : दरम्यान, शिवसेनेच्या स्थापनेनंतर 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेच्या पहिला दसरा मेळावा साजरा झाला. या दसरा मेळाव्याला मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले होते. यानंतर शिवसेनेनं आपली हळूहळू घोडदौड आणि विस्तार राज्यभर करायला सुरुवात केली. 1968 रोजी शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत प्रवेश मिळाला. 1971 रोजी शिवसेनेचा पहिला महापौर झाला. दादरचे डॉ. हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेचे पहिले महापौर झाले. 1972 रोजी प्रमोद नवलकर विधानसभेत गेले. पुढं ठाण्यात सतीश प्रधान हे शिवसेनेतर्फे महापौर झाले. यानंतर 1975 रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली. त्या आणीबाणीला बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता. 1980 रोजी शिवसेनेनं काँग्रेसला मदत केल्यामुळं काँग्रेसनं शिवसेनेला विधानपरिषदेवर दोन जागा दिल्या होत्या. यानंतर 1984 रोजी शिवसेनेनं भाजपासोबत युती केली. पण भाजपा पुलोदमध्ये सहभागी झाल्यामुळं ही युती तुटली. तेव्हा कमळाबाई आम्हाला सोडून गेली, अशी मिश्किल प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती. 1995 मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे महाराष्ट्रात पहिल्यांदा सरकार आले. मनोहर जोशी हे युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री झाले. यानंतर काही महिन्यांसाठी नारायण राणे हे मुख्यमंत्री होते. 2014 रोजी भाजपा आणि शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली. पण पुन्हा सरकारमध्ये हे दोघे एकत्र आले. यानंतर 2019 विधानसभा निवडणुकीनंतर अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून युती तुटली. यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवार यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे हे मविआचे मुख्यमंत्री झाले.

शिवसेनेत आतापर्यंत झालेलं बंड : दुसरीकडं, शिवसेना ही मराठी माणसासाठी आणि न्याय हक्कासाठी जरी असली, तरी याच शिवसेनेतून मराठी माणूसच बंड करत गेला. अद्यापपर्यंत शिवसेनेत अनेक बंड झाल्याचा शिवसेनेचा इतिहास आहे. पण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे आजवरचे सर्वात मोठं बंड होतं. सुरुवातीला बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे छगन भुजबळ हे डझनभर आमदारांना घेऊन काँग्रेससोबत गेले. यानंतर नारायण राणे हे बारा आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेससोबत गेले. यानंतर लगेच बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःचा पक्ष मनसे स्थापन केला. यानंतर झालेल्या 2014 रोजी निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे विधानसभेत 62 आमदार निवडून आले. 2019 रोजी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपानं एकत्र निवडणूक लढवली. मात्र अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून युती तुटली. कालांतरानं म्हणजे जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बंड केलं. जवळपास सर्व पक्षच एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळं शिवसेनेच्या इतिहासमधील एकनाथ शिंदेंचं हे सर्वांत मोठं बंड मानलं जातं.

पक्ष, चिन्ह शिंदेंना बहाल : "एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर मागील वर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार निवडून आले. तर एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार आले. त्यामुळं खरी शिवसेना आणि संघटना आणि शिवसैनिक आपल्याच बाजूनं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतायेत. मात्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली होती. जवळपास 60 च्यावर आमदार त्यांचे निवडून आले होते. त्यामुळं खरी शिवसेना ही आमचीच हे लोकांनी मान्य केलं असल्याचं एकनाथ शिंदे सांगतायेत. दरम्यानच्या काळात शिवसेना पक्ष, आणि चिन्ह हा वाद सुप्रीम कोर्टात सुरू होता. मात्र कोर्टानं शिवसेना पक्ष, आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना बहाल केलं आहे. त्यामुळं अधिकृत शिवसेना ही सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. तसंच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना गटाकडून कोण बाजी मारणार? याकडेच लक्ष लागलं आहे. परंतु सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती आणि उद्धव ठाकरेंना सोडून जाणारे कार्यकर्ते, नेते यामुळं मुंबई महानगरपालिकेत त्यांना यश मिळेल, किंवा त्यांचा पक्ष पालिकेवर झेंडा फडकवेल, असं सध्यातरी चित्र दिसत नाही, " असं राजकीय विश्लेषत जयंत माईणकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलं आहे.

एकमेकाला टाळी देणार का? : शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन साजरा होत असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी, "आमच्यातील वाद हे क्षुल्लक आहेत. यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे... महाराष्ट्राचे प्रश्न मोठे आहेत," असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. याला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर दोन्हीकडून ही चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. परंतु यावरून केवळ चर्चा होताना दिसतायेत. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दुसरीकडं, शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र यावं, ही मराठी माणसांची भावना आहे. आता मुंबई पालिका निवडणुकीसाठी दोन भाऊ एकत्र आले तर दोन्ही भावांना त्याचा फायदा होईल. ही मराठी माणसाची अपेक्षा असल्याचं बोललं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे उद्या दोन वर्धापन दिन साजरे होतायेत. त्यामुळं दोन्ही गटांकडून एकमेकांवर कोण काय बोलणार? कोणाचा समाचार घेणार? किंवा राज ठाकरेंसोबत एकत्र जाण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे कोणतं भाष्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन शिवसेना, दोन वर्धापन, कोण ठरणार वरचढ? : 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे शिवसेनेची स्थापना केली होती. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा विस्तार झाला. मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी माणूस शिवसेनेमुळं स्वाभिमानानं जगू लागला. त्याला सन्मान मिळू लागला. मराठी बाणा आणि मराठीच्या अस्मितेसाठी शिवसेनेने संघर्ष केला आहे. त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला आज 59 वर्ष होतायेत. पण सध्य़ा शिवसेनेची दोन शकलं पडली आहेत. हेच मराठी माणसांला मुळात पटलेले नाही. शिवसेनेची दोन शकलं हेच खरे मराठी माणसाचे दुःख असल्याचे राजकीय विश्लेषक आणि जाणकार म्हणताहेत. पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच धरतीवर दोन शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरा होत आहेत. एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून षण्मुखानंद येथे वर्धापन दिन साजरा होतोय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन वरळीतील डोम येथे साजरा होत आहे. त्यामुळे कुणीकडे अधिक गर्दी होते? कोणाचे भाषण गाजणार? आणि कोण कोणावर तोफ डागणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; 'या' जिल्ह्यांना यलो, ऑरेंज अलर्ट
  2. माऊलींच्या अश्वराजांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अनोखं वंदन, मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
  3. मेळघाटातील मगरीचं झाड पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये!