छत्रपती संभाजीनगर : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना विरोधीपक्ष नेते तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांची भेट घेतली. भाजपा नेते नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी महाजन यांना धमकी दिल्यानं मनसे कार्यकर्ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळतय. याच प्रकरणी घेतलेली ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. या दोन नेत्यांची भेट म्हणजे दोन्ही पक्षातील दिलजमाईचे प्रतीक आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय.
अंबादास दानवे यांनी घेतली प्रकाश महाजन यांची भेट : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी अचानक मनसे नेते प्रकाश महाजन यांची भेट घेतली. दोन दिवसांपासून प्रकाश महाजन आणि नारायण राणे पिता-पुत्र यांच्यातील शाब्दिक वादातून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्शभूमीवर ही भेट झाली. अंबादास दानवे स्वतः महाजन यांच्या निवासस्थानी गेले होते. अचानक झालेल्या या भेटीमुळं विविध चर्चांना उधाण आलय. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत राज्यात चर्चा सुरू असताना मनसे नेत्याची भेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यानं घेतल्यानं काही शुभ संकेत आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. "प्रकाश महाजन यांनी राणे यांना दिलेलं उत्तर आवडलं. या वयात देखील दंड थोपटून आव्हान दिलं. याचा आदर्श घ्यायला पाहिजे. आमचे वैयक्तिक संबंध असल्यानं भेटलो. राणे केंद्रात मंत्री होते त्यांनी असं बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
राणे यांना रुग्णालयात भरती करा : "अंबादास दानवे मला भेटायला आले, ते चांगले नेते आहेत. आमचे जुने ऋणानुबंध आहेत. आमचे कुळ, मूळ एक असून एकमेकांच्या सुख-दुःखात आम्ही धावून जात असल्यानं ही भेट झाली. त्यांचा स्वभाव चांगला आहे. आनंद वाटला. राणे यांच्या सोबतचा वाद वाढवायचा नाही. मात्र त्यांना बहुदा तो संपवायचा नाही असं वाटत आहे. कारण ते रोजच काही तरी बोलत आहेत. वाद वाढवला नाही तर प्रसिद्धी माध्यमांवर दिसणार नाही. त्यामुळे बहुदा ते बोलत असावेत. ते मला पागल म्हणत आहेत, पण आपण जसे असतो तसे सर्व दिसतात. त्यामुळं त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा," अशी मागणी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली.
हेही वाचा :