मुंबई - महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली होती. या योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेनं राज्यात माझी लाडकी सून उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्यात 'लाडकी सून' उपक्रम राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय.
'लाडकी सून' उपक्रम नेमका कसा असणार?- लाडकी बहीण योजना यशस्वी ठरल्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यातील महिलांचे पाठबळ महायुतीला मिळालं. त्यामुळं महायुतीची सत्ता आली. 'लाडकी सून' या उपक्रमाच्या माध्यमातून लाडक्या सुनेला मदत आणि सहकार्य केलं जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शोषित, पीडित आणि कौटुंबिक छळाला त्रासलेला सुनांना शिवसेनेकडून मदत केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
राज्यातील जिल्ह्यांमध्ये केंद्र स्थापन करणार-अनेक महिला कौटुंबिक हिंसाचार आणि शोषणाला बळी पडतात. महिलांचा विविध स्तरावर होणारा छळ आणि शोषण रोखण्यासाठी शिवसेना लाडकी सून उपक्रम आम्ही राबवत आहोत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये यासाठी आम्ही केंद्र स्थापन करीत आहोत. ज्या महिलांना कौटुंबिक हिंसाचार अथवा छळाला सामोरे जावे लागते, अशा सर्व महिलांना कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर मदत करण्यात येणार आहे. हा उपक्रम लवकरच राबवणार असल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला विशेषता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. यानंतर महिलांना कौटुंबिक होणार छळ किंवा त्रास याबाबत त्या महिलेला पक्षाकडून मदत केली जाणार आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर राज्यभरातील महिलांच्या छळाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक कुटुंबात छळ होत असताना त्यावर महिलांना दिलासा देणारा उपक्रम शिवसेनेकडून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे लाडकी बहीणनंतर पुन्हा एकदा शिवसेना महिलांसाठी उपक्रम राबवून लोकप्रियता मिळविणार असल्याचं चित्र आहे.