ETV Bharat / state

प्राधान्य महायुतीलाच, पण वेळप्रसंगी स्वबळाची आमचीही तयारी; शिवसेनेचा अहिल्यानगरमध्ये मेळावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती कशी असणार? याबाबत मंत्री शंभूराज देसाई कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना शनिवारी मार्गदर्शन करणार आहेत.

AHILYANAGAR LOCAL BODY ELECTIONS
शिवसेना मेळावा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 5, 2025 at 7:17 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, येत्या 7 जूनला अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेनेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला मंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती कशी असणार? याबाबत मंत्री शंभूराज देसाई कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामुळं या मेळाव्यातून शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकणार असल्यानं हा मेळावा पक्षासाठी महत्त्वाचा असणार आहे.

प्रतिक्रिया देताना शिवसेना जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुख (ETV Bharat Reporter)

निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी : विधानसभा निवडणुकानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांकडं राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणूक महायुतीनं एकत्र लढवल्या होत्या. यात महायुतीला चांगलं यशदेखील मिळालं. याच धर्तीवर आगामी निवडणुका या महायुती म्हणून लढणार? की स्वबळावर लढणार? यावर वरिष्ठांकडून निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, निवडणूक पाहता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी जोरदार सुरू आहे.

मंत्री शंभूराज देसाई पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन : येत्या 7 जूनला मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे. याअनुषंगानं गुरूवारी शहरात शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी मेळाव्याबाबत माहिती दिली. पक्षबांधणीसाठी तसंच येणाऱ्या काळात असलेल्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी तसंच पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई येणार आहेत. या मेळाव्यात येणाऱ्या निवडणुकांची रणणिती कशी असावी? यावर चर्चा होणार आहे.

मनपासह जिल्हा परिषदेवर पुन्हा भगवा फडकावणार : "आगामी निवडणुकांमध्ये अहिल्यानगरची महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरपालिका यावर महायुतीच्या माध्यमातून किंवा स्वबळावर पुन्हा भगवा फडकवणार," असं जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितलं. आजवर अनेकदा महापालिका आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मध्यंतरी राजकीय पक्षांमध्ये फुट पडल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांवर कोणत्या पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळते, हे महत्त्वाचं ठरणार आहे. पक्षफुटीनंतर सुरुवातीला अहिल्यानगर जिल्ह्यासह शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिलेदारांनी संयमाची भूमिका घेतली होती. राज्यभरातून शिवसेनेत इन्कमिंग जोरात सुरू होतं. मात्र, अहिल्यानगरमधील शिवसैनिक शिवसेना (यूबीटी) पक्षात थांबले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत शिवसेना (यूबीटी) पक्षात अहिल्यानगरमध्ये अनेक जागांवरुन वाद पाहायला मिळाला. त्यानंतर वरिष्ठांच्या निर्णयाला विरोध करत शहरासह ग्रामीण भागातील अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभेतील निकालानंतर महायुतीला असलेले पोषक वातावरण पाहता अहिल्यानगरच्या पालिकेवर भगवा फडकवला जाईल, असा विश्वास यावेळी शिवसेनेच्या (यूबीटी) पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला.

आमचीही स्वबळाची तयारी पूर्ण : "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. मात्र, येणाऱ्या काळात काही अन्य परिस्थिती निर्माण झाली तर, त्यानुसार स्वबळावर निवडणूक लढवण्याचीदेखील आमची तयारी असणार आहे," असं जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. "महायुती सरकारनं मुंबई आणि महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
  2. "युतीबाबत किंवा एकत्र येण्याबाबत दोन भाऊच ठरवतील", नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे? वाचा सविस्तर...
  3. माजी आमदार दिलीप सानंदांनी काँग्रेसला ठोकला रामराम, कोणता झेंडा घेणार हाती?