"महाराष्ट्रातून ठाकरे नावाचा ब्रँड तुम्ही संपू शकत नाही, मी छाताडावर बसून तुम्हाला गाडेल"-उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी मनसेबरोबर युती करण्याबाबत सकारात्मक संकेत दिलेत.

Published : June 19, 2025 at 10:30 PM IST
मुंबई - आज जे वातावरण आहे, ते वाट्याला येणं ही भाग्याची गोष्ट आहे. अर्थात ही पुण्याई माझी नाही, तर पूर्वजांची आहे. बाळासाहेबांनी रक्त आटवून हा विचार पेरला आहे. हा जल्लोष पाहून कुणाला विश्वास बसणार नाही. एवढे होऊनही यांना वाटत असेल की अजून काय करायचं? आज ज्यांना दाढी फुटली, तेव्हा ते कुठे होते, माहित नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
"मी तुम्हाला जाहीरपणं आव्हान देतो. समोर येऊन वार करा. तुमच्या छाताडावर बसेन," असं उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना जाहीर आव्हान दिलं.
देशाला पंतप्रधान, गृहमंत्री यांची गरज.."भाजपाला पोर होत नाहीत म्हणून ते दुसऱ्याची पोर आणि बाप चोरतात. भाजपानं पळवलेले काही लोक आपल्यावर टीका करत आहेत. या चोरांना काही लाज-लज्जा नाही. नॅपकिनपण ठेवला नाही. सरकारने जे वादे केले होते, ते फसवे होते. आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे. पंतप्रधान भाजपाचा आहे. देशाला गृहमंत्री हवा आहे. घरफोडी अमित शाह नको. आमची इंडियन मुजाहिदसोबत तुलना करताना मोदींना लाज वाटली नाही. मग आमचेच खासदार जगभरात तुम्ही न केलेले शौर्य सांगण्यासाठी पाठवले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांवर केली.
भाजपाला जोड्याने हाणलं पाहिजे- "सगळे घोटाळा करणारे सरकार आहे. भाजपा किती पिढ्या सतरंजा उचलताना घालणार, हे माहित नाही. तुमच्यावर उपरे येऊन बसतात. हिंदू-मुसलमानवर बोलणारा एकजण बसवला आहे. तुमची उंची केवढी? बोलता किती?" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. "भाजपानं फक्त दाऊदला घेणं बाकी आहे. ७० हजार कोटींचा घोटाळा केलेल्यांचं भाजपा पाय धुऊन पाणी पित आहे. मुंबईत आपल्या आपल्यात भांडण लावली जात आहेत. हिंदी सक्ती कशाला हवी आहे? आम्ही हे करू देणार नाही. भाजपाला जोड्यानं हाणलं पाहिजे. भाजपाची भ्रष्ट लोक माता भगिनींना सिंदूर वाटत आहेत," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला.
जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल... सध्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. बुधवारी माजी नगरसेवकांची बैठक झाली. त्या बैठकीत तुम्हाला काय वाटते? असे मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना विचारलं होतं. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, " आज जे शिवसैनिकांच्या आणि राज्याच्या मनात आहे, तेच होईल. मराठी माणसाच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही एक पाऊल पुढे येऊ शकतो," असे सकारात्मक संकेत उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबरच्या युतीबाबत दिले आहेत.
समोर येऊन लढा- "आता राज्यात, देशात अनेक प्रश्न असताना मुंबईत हिंदी भाषेवरून हिंदू मुस्लिमवरून भांडण लावली जात आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी आणि मराठी माणसानं रक्ताचं पाणी करून मुंबईला वाचविलं आहे. ही मुंबई तुम्ही आता हातातून घालू देणार आहात का? असा प्रश्न शिवसैनिकांना यावेळी उद्धव ठाकरेंनी विचारला.
ठाकरे नावाचा ब्रँड तुम्ही संपू शकत नाही-"नाना पाटेकरचा प्रहार सिनेमा आहे. त्यात नाना पाटेकर गुंडासमोर उभे राहून त्यांना कमॉन किल मी, असे म्हणतो. तसं मी आज या सत्ताधाऱ्यांना आव्हान देतो की, कमॉन किल मी! समोर येऊन लढा. समोरून वार करा. पण, महाराष्ट्रात महाराष्ट्रातून ठाकरे नावाचा ब्रँड तुम्ही संपू शकत नाही. हा उद्धव ठाकरे तुमच्या छाताडावर बसून तुम्हाला गाडेल, असं उघडपणे आव्हान उद्धव ठाकरे यांनी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना दिलं आहे.
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाकडून आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाला मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली.

