"थेट बातमीच देऊ... महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच...", मनसे-शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
मनसे आणि शिवसेना (उबाठा) युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.


Published : June 6, 2025 at 3:12 PM IST
मुंबई : आगामी काळात राज्यात महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील सगळेच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. उद्धव ठाकरे हे मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. तसंच राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी अनेकांची इच्छा आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगत असताना, आज मनसे आणि शिवसेना (उबाठा) युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
थेट बातमीच देऊ...: शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना मनसे आणि शिवसेना (उबाठा) युतीबाबत मोठं भाष्य केलं आहे. "माझ्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यांचे मनसैनिक त्यांच्याही मनात कोणताही संभ्रम नाही. ऐकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळं संदेश वैगरे देण्यापेक्षा थेट बातमी देऊ," असं उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेना (उबाठा) युतीबाबत वक्तव्य केलं आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर मनसेकडूनही प्रतिक्रिया समोर आली आहे. "2014 आणि 2017 मध्येही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काहीतरी होतं. मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे, हे जास्त महत्वाचं आहे. जनतेच्या मनात काय आहे. हे आम्हाला माहीत आहे," अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलीय.
शिंदे गटात गेलेल्यांना पश्चाताप होतोय... : दरम्यान, नुकत्याच शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगोडे यांनी आज शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला. सुजाता शिंगोडे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी, "शिंदे गटात लोकं कशासाठी जात आहेत, हे तुम्हाला आता कळलं असेल, शिंदे गटात गेलेल्यांना आता पश्चाताप होतोय. सुजाता ताईंनी जे धाडस दाखवलं आहे, ते शिवसैनिकांमध्येच असू शकतं. बाकी जे गेलेत त्या लाचारांमध्ये हे धाडस असू शकत नाही," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा :

