शिर्डी : दरवर्षी रंगपंचमीनिमित्त हजारो भाविक शिर्डीत येत असतात. यंदाही देश-विदेशातील साईभक्तांनी शिर्डीतील रंगपंचमीला हजेरी लावली. मात्र, या गर्दीत मलेशियाहून आलेल्या रमण आणि ईश्वरी या भाविकांची हिरेजडीत सोन्याची अंगठी मंदिर परिसरात नकळत खाली पडली. दर्शनानंतर अंगठी हरवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. परंतु, अंगठी परत मिळण्याची आशा त्यांनी सोडली होती. मात्र, साईबाबा संस्थानच्या प्रामाणिक कर्मचाऱ्यामुळं या भाविकांना आपली अंगठी परत मिळाली.
नेमकं काय घडलं? : गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी रंगपंचमीनिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी रमण आणि ईश्वरी हे पती-पत्नी येत असतात. या वर्षीही ते साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. मात्र, दर्शनासाठी मंदिरात जात असतांना साई मंदिराच्या गेट क्रमांक एकवर रमण यांच्या बोटातून नकळत हिरेजडीत सोन्याची अंगठी खाली पडली. साईबाबांचं दर्शन घेऊन हॉटेलवर परतल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. मात्र, अंगठी परत मिळेल याची त्यांना शंका होती. तरीही एकदा प्रयत्न म्हणून त्यांनी साई संस्थानच्या सुरक्षा विभागाशी संपर्क साधला आणि त्यांची अंगठी मिळाली.
हिरेजडीत सोन्याची अंगठी मिळाली परत : साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागातील कंत्राटी महिला कर्मचारी श्रद्धा सोनवणे या साई मंदिराच्या गेट क्रमांक एकवर ड्युटीला होत्या. हिरेजडीत सोन्याची अंगठी सापडल्यानंतर त्यांनी तत्काळ ही अंगठी सुरक्षा विभागाचे अधिकारी रोहिदास माळी यांच्याकडं जमा केली. भाविकानं सुरक्षा विभागाचे अधिकारी माळी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पडताळणी करण्यासाठी त्यांना बोलविण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते या भाविकांना त्यांची हिरेजडीत सोन्याची अंगठी परत करण्यात आली. तर, साई संस्थानच्या वतीनं विशेष सत्कार करुन श्रद्धा सोनवणे यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं.
अंगठीची किंमत काय? : साईबाबा संस्थानच्या प्रामाणिक सुरक्षा रक्षक महिलेमुळं आम्हाला आमची हिरेजडीत सोन्याची अंगठी परत मिळाली. 12 ग्रॅम वजनाची ही अंगठी असून तिची किंमत 1 लाख रुपये असल्याची माहिती भाविकांनी दिली. तसंच "श्रद्धा सोनवणे यांच्या प्रामाणिकपणामुळं आमची अंगठी आम्हाला परत मिळाली. आज माझ्या वाढदिवसाचं संस्थाननं मोठं गिफ्ट दिलंय," अशी भावना भाविक ईश्वरी यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -