शिर्डी (अहिल्यानगर) : दक्षिणेतील साईभक्तांसाठी शिर्डी साईबाबा संस्थानने एक आनंदवार्ता दिली आहे. शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीनं येत्या १० एप्रिलपासून २६ एप्रिलपर्यंत साईबाबांच्या 'मूळ चर्म पादुका' भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. देशाभरात हा पादुका दर्शन सोहळा आयोजित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दक्षिण भारतातील आठ शहरात साईंच्या चर्म पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी "ई टीव्ही भारतशी" बोलताना दिली.
पादुका दर्शन सोहळा : 'शिर्डीस लागतील ज्याचे पाय, टळतील अपाय सर्व त्याचे...' शिर्डीच्या साईबाबांचं हे वचन प्रमाण मानून देशभरातील कोट्यवधी साईभक्त दरवर्षी नेमाने साईबाबांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या शिर्डीत दाखल होतात. आता मात्र साक्षात साईबाबांचे चरण त्यांच्या भक्तांच्या शहरात येणार आहेत. ज्या भाविकांना शिर्डीला येणं काही कारणांमुळे शक्य होत नाही अशा अनेक भाविकांनी बाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या मूळ चर्म पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्याची विनंती शिर्डी साईबाबा संस्थानकडे केली होती. येत्या १० एप्रिल पासून ते २६ एप्रिलपर्यंत साईंच्या 'मूळ चर्म पादुका सोहळा' साई संस्थानच्या वतीनं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, या राज्यातून भाविकांची मोठी मागणी असल्यानं साईंच्या पादुका येथील भाविकांना दर्शनासाठी घेवून जाणार असल्याची माहिती, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
काय आहेत नियम? : भाविकांना साईंच्या मूळ चर्म पादुकाचं दर्शन मिळावं या हेतूनं हा 'साई चर्म पादुका दर्शन सोहळा' आयोजित करण्यात आलाय. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या साईबाबांच्या मूळ चर्म पादुका भाविकांना दर्शनासाठी बाहेर घेऊन जात असल्यानं, भाविकांना कशा पद्धतीनं दर्शन देता येईल याबाबत संस्थानच्या वतीनं नियमावली तयार करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पादुका सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्याच ठिकाणी पादुका ठेवण्यात येणार आहेत. कोणत्याही भाविकांच्या घरी या पादुका नेण्यात येणार नाही. साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनासह सुरक्षारक्षक तसेच साई मंदिरातील पुजारी असा एकूण २० कर्मचाऱ्यांचा या पादुका सोहळ्यात सहभाग असणार आहे. शिर्डीत साईबाबांच्या मंदिरात जे नित्य नेमाने कार्यक्रम होतात तसेच कार्यक्रम पादुका सोहळ्यादरम्यान होणार आहेत.
त्रिसदस्यीय कमिटीनं घेतला निर्णय : महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू या तीन राज्यातील भाविकांची मागणी पाहता साईबाबांच्या मूळ चर्म पादुका घेवून जाण्याचा निर्णय साई संस्थाच्या त्रिसदस्यीय कमिटीने घेतला. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं साईबाबा संस्थानवर त्रिसदस्यीय कमिटी नेमली. या कमिटीत अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश हे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आहेत. साईबाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या मूळ चर्म पादुका भाविकांना दर्शनासाठी शिर्डी बाहेर घेऊन जाण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तसेच साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (आयएएस) यांचा आंतर्भाव असलेल्या कमिटीने घेतला. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता साई संस्थानकडून करण्यात आली असल्याची माहिती, गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
असं असणार साई पादुका दौरा सोहळ्याचं वेळापत्रक : १० ते १३ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील सांगली शहर आणि जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे भाविकांना दर्शनासाठी साईंच्या मूळ चरण पादुका दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत. १४ ते १८ एप्रिलपर्यंत कर्नाटक राज्यातील, दावनगेरे, मल्लेश्वरम येथे सहा दिवस साईबाबांच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी असणार आहे. यानंतर १९ एप्रिल रोजी सायंकाळी तामिळनाडूच्या दिशेने पादुका रवाना होतील. १९ ते २६ एप्रिल पर्यंत तामिळनाडू राज्यातील, सेलम, करूर, पुलीयमपट्टी, धर्मापुरी येथे साईंच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार असून धर्मापुरी येथून २६ एप्रिल रोजी संध्याकाळी साईंच्या पादुका पुन्हा शिर्डीकडं रवाना होणार आहे. असा तब्बल २७७६ किलोमीटरचा साईंच्या मूळ चर्म पादुकांचा दौरा असणार आहे. अशी माहिती गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
हेही वाचा -