शिर्डी : साई बाबांच्या झोळीत हात घालणाऱ्या कर्मचाऱ्याला शुक्रवारी शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल तीनवेळा चोरी आणि दोनवेळा चोरीचा प्रयत्न करणाऱ्या या महाभागाला आणखी कोणी कोणी साथ दिली होती का? याबाबत पोलीस तपासात करणार आहेत. भाविकानांच्या श्रद्धेच्या दानावर डल्ला मारणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.
काही दिवसांपूर्वी समोर आला होता धक्कादायक प्रकार : शिर्डी साई बाबांच्या चरणी भाविक मोठ्या श्रध्देनं दान करतात. या दानाची मोजदाद साई बाबा संस्थानच्या वतीनं आठवड्यातून शुक्रवार आणि मंगळवार या दिवशी केली जाते. ही मोजदाद संस्थानच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. साई बाबा संस्थानच्या लेखा विभागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेला शिपाई बाळासाहेब नारायण गोंदकर हा मोजणी करताना पैसे लपवायचा. यानंतर तो पैसे चोरुन न्यायचा. हा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता.
साई बाबा संस्थाननं केली होती तक्रार : ही बाब साई बाबा संस्थानच्या लक्षात आल्यानंतर साई संस्थाननं मोजणी कक्षातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात बाळासाहेब गोंदकर नोटांची मोजणी करताना नोटांचं बंडल आधी स्वतःजवळ ठेवायचा. त्यानंतर त्याच मोजणी कक्षातील विविध ठिकाणी लपवायचा. असं करत दुसऱ्या दिवशी चोरलेलं नोटांचं बंडल तिथून घेऊन जायचा. भाविकांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या तसंच भक्तांसह साई संस्थानची ही फसवणूक करणाऱ्या या बहादराविरोधात साई संस्थानने गेल्या 29 मे रोजी तक्रार दाखल केली होती.
पैसे चोरण्यासाठी असं लावलं डोकं : साई संस्थानच्या दान मोजणी कक्षात मोजणीसाठी प्रवेश करताना आणि बाहेर जाताना कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते. मात्र बाळासाहेब गोंदकरनं चोरी करताना शक्कल लावली. नोटांचं बंडल त्यानं मोजणी कक्षात कधी मोजणी मशीनमध्ये तर कधी ट्रेमध्ये लपवलं. गोंदकर लेखा शाखेतील शिपाई असल्यानं तो पुन्हा मोजणी कक्षात जाऊन पैसे बाहेर आणायचा. अशा पद्धतीनं त्यानं तीन वेळा रक्कम लंपास केल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलं आहे.
गोंदकरचा साथीदार कोण? : साई बाबा संस्थानच्या दानपेटीच्या मोजणीच्या वेळी रक्कम लंपास करणाऱ्या बाळासाहेब नारायण गोंदकर याला तातडीनं निलंबित केलं. यासह त्याच्याविरोधात 29 मेला शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी शिर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली. आता त्याला न्यायालयत हजर करण्यात येणार आहे. गोंदकरची कस्टडी मिळाल्यानंतर त्यानं चोरलेली रक्कम आणि या चोरीत त्याचे इतर कोणी साथीदार होते का? हेही समोर येणार आहे. साई संस्थानकडं केवळ पंधरा दिवसाचंच सीसीटीव्ही फुटेज जतन करुन ठेवलेलं असतं. त्यामुळे या आधीही अशा चोऱ्या बाळासाहेब गोंदकर आणि इतरांनीही केल्या होत्या का? हे सगळं आता पोलिसांच्या तपासातून समोर आणणं गरजेचं आहे.
हेही वाचा :