शिर्डी : साई बाबांच्या भक्तांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. व्हीआयपींना ब्रेक दर्शनाचा लाभ आता दिवसांतून केवळ तीनवेळाच घेता येणार आहे, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वीच माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी शिर्डीत ब्रेक दर्शन सुरू करण्याची मागणी केली होती.
भाविकांना होत असे त्रास : गेल्या काही काळापासून महत्त्वाची व्यक्ती साई मंदिरात आली, तर त्यांच्या दर्शनासाठी दिवसभरात केव्हाही सामान्य दर्शनरांग थांबवावी लागत होती. यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच, दर्शनाला बराच वेळदेखील लागत होता. याशिवाय सुरक्षा आणि इतर प्रशासकीय यंत्रणांवरही अतिरिक्त ताण येत होता. या पार्श्वभूमीवर संस्थानच्या तदर्थ समितीनं नव्या ब्रेक दर्शन व्यवस्थेचा निर्णय घेतला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
कशी आहे नवी ब्रेक दर्शन व्यवस्था : साई मंदिर प्रशासनाच्या नव्या नियमांनुसार शिफारस घेऊन येणाऱ्या भक्तांना आता केवळ निश्चित वेळेतच साई दर्शन घेता येणार आहे. यासाठी दिवसातून तीन टप्प्यांमध्ये वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
- सकाळी 9:00 ते 10:00 (एक तास)
- दुपारी 02:30 ते 03:30 (एक तास)
- रात्री 8:00 ते 08:30 (अर्धा तास)
या वेळेत समाधी मंदिरातील एका बाजूनं ब्रेक दर्शनाची सोय केली जाईल. जेणेकरून सामान्य भक्तांची दर्शनरांग अव्याहतपणे सुरू राहील.
ब्रेक दर्शनातून यांना सूट : साई मंदिरात ब्रेक दर्शनासाठी काही अतिमहत्वाच्या व्यक्तींना आणि देणगीदारांना वेळेचं बंधन असणार नाही. त्यांची दर्शनाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच असेल. राजकीय आणि न्यायिक पदाधिकारी, भारताचे आजी-माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष/उपाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री, विधानसभा/विधानपरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, आमदार, खासदार आणि विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश, प्रसिद्ध उद्योगपती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सिने अभिनेते, शास्त्रज्ञ आणि संस्थानच्या व्यवस्थापन/तात्पुरत्या समितीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, त्याचबरोबर 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणारे भाविक यांना या वेळेचं बंधन असणार नाही. ही मान्यवर मंडळी कधीही ब्रेक दर्शनाच्या माध्यमातून साई बाबांचं दर्शन घेऊ शकतात.
नेमकी ही व्यवस्था कोणासाठी? : साई मंदिराच्या दर्शनासाठी बराच वेळ लागतो, तासन् तास रांगेत उभं राहावं लागते. पण काही जण महत्वाच्या व्यक्तींची ओळख सांगून किंवा जनसंपर्क कार्यालयातून सशुल्क पास काढून झटपट दर्शन करून घेतात. अशा भक्तांना एका विशेष गेटनं मंदिरात सोडलं जातं होतं. अशा स्थितीत त्या व्यक्तीच्या दर्शानासाठी सर्वसामान्य भाविकांची दर्शनरांग थांबवून त्यांना प्राधान्य दिलं जात होतं. यामुळे कधीही दर्शन रांग थांबवली जायची आणि सामान्यांच्या दर्शनात अडथळा यायचा. पण आता अशा लोकांसाठी दिवसातून केवळ 3 तासच राखून ठेवण्यात येणार असून त्यासाठी एक वेगळी लाईनही राहणार आहे.
हेही वाचा-