अहिल्यानगर : शेवगाव येथे भाजपाचे नेते अरुण मुंढे यांनी 4 व ५ जून रोजी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येणार आहेत. पण यावरून आता जिल्हा भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच नाराज झाले आहेत. वास्तविक, अरुण मुंढे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाऐवजी विरोधी उमेदवाराचा प्रचार केला. अशा स्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मुंढे यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावू नये, असं आवाहन जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच, पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.
बक्षीस वितरणाला भाजपाचे बडे नेते येणार : अरुण मुंढे यांनी त्यांच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला ‘देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा,' असं नाव दिलं आहे. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येणार आहेत. यामुळे शेवगावमधील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्या अरुण मुंढे यांच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष येत असल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असं आवाहन शेवगावमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. या निमित्ताने शेवगावमधील भाजपा अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला न येण्याबाबतचं निवेदन शेवगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक अशोक आहुजा, माजी तालुकाध्यक्ष बाप्पूसाहेब पाटेकर, भाजपा शहराध्यक्ष बापूसाहेब धनवडे, सरचिटणीस भिमराज सागडे, नगरसेवक सागर फडके, नगरसेवक गणेश कोरडे व सर्व भाजपा शेवगांव तालुका व शहर पदाधिकारी यांनी दिलं आहे.
अरुण मुंढे-मोनिका राजळे वाद वाढणार? : विधानसभा निवडणुकीत पक्षातील वरिष्ठांनी मुंढे यांना राजळे यांच्यासोबतचा वाद मिटवून पक्षाचे काम करण्याचा आदेश दिला होता. पण असे असतानादेखील मुंढे यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत विरोधी भूमिका घेतली होती. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार मोनिका राजळे यांच्याविरोधात भूमिका घेत अरुण मुंढे यांनी काम केलं. दरम्यान, मुंढे तसेच त्यांच्या समर्थकांनी विरोधात काम करुनही मोनिका राजळे यांनी तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक मारत विरोधकांना जोरदार उत्तर दिलं.
कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाणार- एकीकडे अरुण मुंढे पक्षाकडून जिल्हाध्यक्ष पद, राज्य कार्यकारीणीत पद उपभोगतात. तर दुसरीकडे विधानसभेच्या निवडणूकीत भाजपा उमेदवाराच्या विरोधात उघड-उघड काम करतात. हे सर्व कार्यकर्त्यांनी पाहिलं आहे. विधानसभा निवडणूक काळात अरुण मुंढे यांच्या पक्षविरोधी काम करण्याबाबतच्या तक्रारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केल्या आहेत. पक्ष निरीक्षकांनीही अरुण मुंढे यांना समज दिली. तरीही भाजपा उमेदवारांच्या विरोधात काम करीत होते. निवडणुकीनंतर अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्यानं अरुण मुंढे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, असं निवेदन दिलं होतं. पण तरीही मुंढे पक्षाविरोधात काम राहिले. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांचे उदात्तीकरण करुन पक्षात चुकीचा संदेश जाईल, अशी भावना शेवगाव भाजपा कार्यकर्त्यांची तसेच, पदाधिकाऱ्यांची आहे.
हेही वाचा-