मुंबई : रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी बुधवारी मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. यावेळी आस्वाद पाटील यांच्यासह शेकापच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. शेकापचे नेते जयंत पाटील यांचे पंडित पाटील हे भाऊ आहेत, तर आस्वाद पाटील हे जयंत पाटील यांच्या भगिनी माजी आमदार मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आहेत. पंडित पाटील व आस्वाद पाटील यांनी शेकापला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या घरातच राजकीय फूट पडली आहे. यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
पंडित पाटील यांच्या अनुभवाचा पक्षाला लाभ होईल : रविंद्र चव्हाण यांनी यावेळी पंडित पाटील यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपात स्वागत केले व त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. शेकापच्या जुन्या व नव्या पिढीने एकत्रितपणे भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे रायगड जिल्हा शत प्रतिशत भाजपा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, पक्षात प्रवेश केलेल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगून पंडित पाटील यांच्या अनुभवाचा पक्षाला लाभ होईल. ही सर्व मंडळी तळागाळापर्यंत काम करणारी मंडळी आहेत. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा लाभ होईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच, पंडित पाटील यांच्या आमदारकीबाबत बोलताना याबाबत भाजपाचे संसदीय बोर्ड निर्णय घेते, मात्र पंडित पाटील विधानसभेत यावेत, यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही रविंद्र चव्हाण यांनी दिली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महेश बाल्दी, विक्रांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील उपस्थित होते.
स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत ताकद दाखवून देऊ : पंडित पाटील यांनी बोलताना भाजपाला रायगड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. आपण गेली काही वर्षे सत्तेपासून दूर होतो. मात्र आपली लोकप्रियता कायम आहे, आजपर्यंत इंजिनाशिवाय चाललो होतो. मात्र आता रविंद्र चव्हाणांचे इंजिन जोडले गेल्याने जिल्हा विकासाला वेग येईल, असा विश्वास पंडित पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत ताकद दाखवून देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील अपुरे प्रकल्प पूर्णत्वास नेऊ, वडखल ते थळ प्रवासी रेल्वे व्हावी यासाठी पाठपुरावा करु व इतर समस्या सोडवण्यास प्राधान्य देऊ, असे पंडित पाटील म्हणाले.
शेवटपर्यंत भाजपामध्ये राहण्याची ग्वाही : आई, वडील, बहिणीने वाढवलेल्या शेकाप पक्षात आजपर्यंत काम केल्याचे सांगत आयुष्याच्या शेवटपर्यंत भाजपामध्ये राहण्याची ग्वाही पंडित पाटील यांनी दिली. तसेच, भाजपात येताना आपला लिलाव झालेला नाही. शेकापमध्ये असताना महाविकास आघाडीचे काम प्रामाणिकपणे केले, मात्र लोकसभेला ज्या अनंत गीतेंचे पुष्कळ काम केले. त्या गीतेंनी पराभवानंतर आपला कॉल उचलला नाही, तर ज्यांच्याविरोधात काम केले ते तटकरे मात्र कॉल उचलतात, असे पंडीत पाटील यांनी सांगितले. याशिवाय, शेकापमध्ये पूर्वीचे नेते निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेत असत, आता विश्वासात घेत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच माझ्या बोलण्याने कधीही शब्द मागे घ्यावे लागणार नाहीत, असे ते म्हणाले.
माझा डीएनए काँग्रेस विरोधात : आपल्याला इतर पक्षात देखील अनेक ऑफर होत्या, मात्र सर्व उपनद्या शेवटी मुख्य गंगा नदीला जावून मिळत असल्याने भाजपात प्रवेश केल्याचे पंडीत पाटील म्हणाले. सुनील तटकरेंना जे मदत करतात, त्यांना तटकरे मदत करत नाहीत, हा त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, माझा डीएनए कॉंग्रेस विरोधात आहे. शेकापने विविध पक्षासोबत आघाडी केली. मात्र त्याचा लाभ आघाडी केलेल्यांना झाला, शेकापला झाला नाही. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद १ मे या महाराष्ट्र दिनापूर्वी जाहीर व्हावे अशी अपेक्षा पंडीत पाटील यांनी व्यक्त केली. याशिवाय, जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजनाची बैठक अर्थमंत्र्याकडे झाली, हे लोकशाहीला घातक असल्याची टीकाही पंडीत पाटील यांनी केली.
हेही वाचा :