सातारा : ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार २१ एप्रिल रोजी सह्याद्री कारखान्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत कारखाना निवडणुकीचा विजयोत्सव साजरा होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी बॅलेट पेपवर झालेली निवडणूक जिंकल्यानंतर भाजपा विरोधकांकडून ईव्हीएमला विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार ईव्हीएमविरोधात रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.
भाजपा आमदाराच्या पॅनेलचा दारूण पराभव : सह्याद्री साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलविरोधात भाजपा आमदार आणि भाजपा जिल्हाध्यक्षाचे स्वतंत्र पॅनेल रिंगणात होते. भाजपा आमदाराच्या पॅनेलला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकरांच्या गटाची साथ होती. परंतु, बॅलेट पेपरवर मतदान झालेल्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने एकहाती विजय मिळवत भाजपा आमदाराच्या पॅनेलचा दारूण पराभव केला.
सह्याद्रीच्या निवडणुकीनंतर ईव्हीएमला विरोध वाढला : विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मनोज घोरपडेंनी बाळासाहेब पाटील यांचा ४४ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र, बॅलेट पेपरवर झालेल्या सह्याद्री कारखाना निवडणुकीत भाजपा आमदाराच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीतील विजय ईव्हीएमचा होता, असा थेट आरोप खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केला आहे. यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत, असा सूर भाजपा विरोधकांकडून आळवला जाऊ लागला आहे.
बॅलेट पेपरवर भाजपचा पराभव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१४ पासून शरद त्यांच्या बालेकिल्ल्याला हादरे बसायला सुरुवात झाली. २०२४ ला महायुतीनं जिल्ह्यातील सर्व ८ जागा जिंकून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं पानिपत केलं. कराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगाव आणि पाटण मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरले. विजयी उमेदवारांचे मताधिक्क्य देखील अनपेक्षित होते. मात्र, चारच महिन्यात बॅलेट पेपरवर झालेल्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला.
शरद पवार ईव्हीएमविरोधात रणशिंग फुंकणार? : ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत २१ एप्रिल रोजी सह्याद्री कारखाना निवडणुकीचा विजयोत्सव तसेच नवनिर्वाचित संचालकांचा जंगी सत्कार शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने यशवंतरावांच्या कर्मभूमीतून शरद पवार ईव्हीएमविरोधात रणशिंग फुंकणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं २१ रोजीचा त्यांचा दौरा मोठ्या राजकीय घडामोडींचा ठरणार आहे. तसंच शरद पवार काय भाष्य करतात, याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
कराड दौऱ्यात रंगणार काका-पुतण्याची जुगलबंदी : शरद पवारांच्या दौऱ्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार १९ एप्रिल रोजी कराड दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका उंडाळकरांचे सुपत्र ॲड. उदयसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर २१ एप्रिलला शरद पवार सह्याद्री कारखान्यावर आहेत. दोन दिवसाच्या फरकाने काका-पुतण्या कराड दौऱ्यावर असल्यानं काका-पुतण्याच्या राजकीय जुगलबंदीकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
हेही वाचा -
- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना काका-पुतण्यानं केलं अभिवादन, प्रीतिसंगमावर मान्यवरांनी घेतलं समाधीचं दर्शन
- खासदार शरद पवार उद्या सातारा दौऱ्यावर, कृष्णाकाठावर होणार राजकीय खलबतं - Sharad Pawar visit Satara
- महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील? शरद पवारांनी सांगितला थेट आकडाच! - Lok Sabha Election 2024