शिर्डी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांनी खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडं त्यांच्या तब्येतेची विचारपूस केली होती, याबाबत आज शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ते आज अहिल्यानगरच्या श्रीरामपूर इथं माध्यमांशी बोलत होते.
पवारांच्याहस्ते रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान : अहिल्यानगरच्या श्रीरामपूर इथं आज (11 जून) रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांच्या १०व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी शरद पवार श्रीरामपूर इथं आले होते. याच कार्यक्रमात एम. के. सी. एल. चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांना पवार यांच्याहस्ते रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच बरोबरीने विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलाच्या ज्यूनियर कॉलेजच्या नूतन वास्तूचं उद्घाटनही शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते.
सुप्रिया सुळे यांच्याकडं पवारांच्या तब्येतीची चौकशी - वास्तविक, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर निवडक भारतीय खासदारांनी परदेशात जाऊन दहशतवादाच्या विरोधात देशाची भूमिका मांडली. या खासदारांचं शिष्टमंडळ भारतात परतलं. यानंतर सर्व खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे देखील होत्या. यावेळी त्यांच्याशी बोलताना पंतप्रधानांनी सुप्रिया सुळे यांच्याकडं शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यावर आज शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
जयंत पाटलांबाबत चर्चा करून निर्णय घेणार - यानंतर शरद पवार यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी (10 जून) वर्धापन दिनी राजीनाम्याचे संकेत दिले, याबाबतही विचारलं असता, ते म्हणाले, "या विषयावर इतरांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे". तसंच, पवारांनी पाऊस आणि शेतीबाबतही वक्तव्य केलं. सध्या हवामानाची स्थिती चांगली आहे. उशीर झाला तरी शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असा विश्वास दिला.
हेही वाचा