पुणे : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोन पर्यटक पुण्याचे आहेत. या दोघांचंही पार्थिव आज पहाटे पुण्यात दाखल झालं होतं. त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं.
पवार यांनी जगदाळे यांच्या कुटुंबीयांचं केलं सांत्वन : शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी जगदाळे कुटुंबीयांनी पवारांशी संवाद साधत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यावेळी संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे यांनी पहलगाममधील भयावह प्रसंग सांगितला.

अर्धा तासाच्या आत मारून निघून गेले : "तिथं एकही सुरक्षा रक्षक नव्हता. रक्तात पडलेली आमची माणसं होती. आम्ही कोणाला आवाज देणार तिथं? आम्ही खूपच घाबरलो होतो. ते बंदूक घेऊन आले आणि त्यांनी गोळ्या मारायला सुरुवात केली. त्यांनी काहीच बघितलं नाही. डोक्यात, डोळ्यात, छातीत गोळ्या मारल्या. ते सहा ते सात लोक होते आणि अर्धा तासाच्या आत त्यांनी येऊन गोळ्या झाडल्या व निघून गेले," काळजाचा थरकाप उडवणारा असा हा प्रसंग संतोष जगदाळे यांच्या पत्नीनं शरद पवारांना सांगितला.

जशास तसं उत्तर द्या : "आता मी माझ्या नवऱ्याला कुठं बघणार? पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जशास तसं उत्तर द्या," अशी मागणी जगदाळे कुटुंबीयांनी शरद पवारांकडं केली.

हेही वाचा -