पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मंगळवारी वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार यांची सरकारवर टीका : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीका केली. "एक काळ असा होता की जवाहरलाल नेहरु यांचं नेतृत्व आणि भारत सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी ओळखला जायचा. आज आमचे पाकिस्तान, चीन, बांग्लादेशसोबत संबंध चांगले नाहीत. ज्या बांग्लादेशसाठी भारतानं त्याग केला. तो बांग्लादेश देखील आपल्यासोबत नाही. देशाचं नेतृत्व करणाऱ्यांनी सुंसवादाची परिस्थिती जाणीपूर्वक निर्माण केलेली नाही. त्याचा परिणाम देश भोगतोय. आम्ही राजकारण करणार नाही सर्वांना सोबत घेऊन देशाच्या हितासाठी काही निर्णय घेणे गरजेचं आहे," असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलं.
आज मला आर. आर. पाटील यांची आठवण येत आहे : "आजचा दिवस हा 26 वा वर्धापन दिन असून 26 वर्षांपूर्वी आपण एकत्र आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. याला अनेक लोकांची साथ मिळाली. फार थोड्या दिवसात आपल्या सहकाऱ्यांना राज्याची सेवा करण्याची संधी राज्यातील जनतेनं दिली. पक्षासाठी अनेकांनी काम केलं. पण आज मला आर. आर. पाटील यांची आठवण येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य जनतेमधील माणसाला देखील संधी देतो. संधी दिल्यावर ते राज्यासाठी योग्य काम करू शकतात हे त्यांनी राज्याला दाखवून दिलं. अनेकांना पक्षाच्या माध्यमातून केंद्रात देखील काम करण्याची संधी मिळाली. या पक्षातील कार्यकर्त्याना संधी मिळाल्यावर निर्णय असे घेतले की ज्याचा फायदा राज्याला झालाय, असं शरद पवार कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
जवाहरलाल नेहरू सगळ्यांना सोबत घेऊन जायचे : "पक्ष फुटला जे आज राहिले ते पक्षाच्या विचारानं राहिले. जनतेच्या सुख दुःखात साथ द्यायला राहिले आहेत. अनेकवेळा पक्षातील लोक सोडून गेले. पण पक्षातील कार्यकर्त्यांमुळं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आलं. जे आले गेले त्याची चिंता करू नका आज जे कोणी आहे ते मौल्यवान ठेवा आहे. सत्ता ही आपोआप येईल आणि तशी स्थिती राज्यात दिसत आहे. आज दोन दृष्टीनं देशाचा विचार करावा लागणार आहे. राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी कधीच राजकारण आणत नाही. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी आम्ही सरकारवर कोणतीही टीका केली नाही. त्यावेळी सरकारनं देश म्हणून जी भूमिका घेतली. त्यांच्या मागं आपण उभं ठामपणे उभे राहिलो. आज देशाचा नकाशा पाहिला तर एकीकडं चीन, दुसरीकडं पाकिस्तान, मग बांगलादेश आणि श्रीलंका आहे. आज आपल्याकडं काय परिस्थिती आहे. एक काळ असा होता की जवाहरलाल नेहरु यांचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी ओळखला जायचा. आज पाकिस्तान, चीन, बांग्लादेश सोबत आपले संबंध चांगले नाहीत. बांग्लादेशसाठी भारतानं त्याग केला. तो बांग्लादेश देखील आपल्यासोबत नाही. देशाचं नेतृत्व करणाऱ्यांनी सुंसवादाची परिस्थिती जाणीपूर्वक निर्माण केलेली नाही. त्याचा परिणाम देश भोगतोय, असं शरद पवार म्हणाले.
जयंत पाटलांनी दिले राजीनामा देण्याचे संकेत : पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणात राजीनामा देण्याचं संकेत दिले. यावर पवार म्हणाले, "जयंत पाटील यांनी आठ ते दहा वर्षे पक्षाचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलय. त्यांनी सांगितलं की नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही त्याला विरोध केला. जयंत पाटलांबाबत निर्णय घेताना पक्षातील सर्वांशी बोलून निर्णय घेऊ. राज्यातील तालुक्या-तालुक्यात नवीन नेतृत्व उभा केलं जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवायच्या की स्वतंत्रपणे लढवायच्या याचा निर्णय जिल्हा नेतृत्व घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की नवीन नेतृत्वाचा निर्णय घेतला जाईल. पुढच्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं जाईल" असं पवार म्हणाले.
हेही वाचा :