सातारा - मोक्का गुन्ह्यातून जामीनावर सुटलेल्या आणि सातारा जिल्ह्यातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना पिस्तुले विक्रीसाठी आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं. त्यांच्याकडून ६ पिस्तुले, ६ मॅगझिन, ३० काडतुसे, मोबाईल आणि कारसह १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमीत ऊर्फ बिऱ्या कदम (रा.लोणी) आणि विशाल महादेव चव्हाण (रा. भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा), अशी संशयितांची नावे आहेत.
रेकॉर्डवरील गुंडांची झाडाझडती : बकरी ईद आणि संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले होते. तसेच तडीपार गुंडांची माहिती काढुन कारवाई करण्याची सुचनाही केली होती. खबऱ्याकडून एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना माहिती मिळाली की, मोक्कातून जामीनावर सुटलेले आणि सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेले दोघेजण मारुती कारमधून (एम. एच. 12 टी. एस. 1889) नीरा-लोणंद मार्गावर देशी बनावटीची पिस्टल आणि काडतुसे विक्रीसाठी येणार आहेत.
सापळा रचून संशयितांना पकडलं : सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या पथकाला कारवाईची सूचना केल्यानंतर त्यांनी नीरा-लोणंद मार्गावर सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मारूती सुझुकी कार येताच पोलिसांनी कारमधील गुंडाना ताब्यात घेतलं. झडतीत त्यांच्याजवळ ६ देशी बनावटीची पिस्तुले, ६ मॅगझिन, ३० जिवंत काडतुसे, २ मोबाईल आढळले. कारसह सर्व मुद्देमाल जप्त करून दोन्ही तडीपार गुंडांना जेरबंद केलं.
लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद : अवैध शस्त्र बाळगणे, तडीपारीचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही संशयितांवर लोणंद पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे.
हेही वाचा -