सातारा : कुटुंबासोबत कास धरणाजवळ क्रिकेट खेळत असताना मुलाचा चेंडू पाण्याजवळ गेला. यावेळी बॉल आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय चिमुकल्याचा पाय घसरून तो कास धरणात बुडाला. यात त्याचा मृत्यू झाला. राकेश कमल विश्वकर्मा (मूळ रा. नेपाळ सध्या रा. मंगळवार तळे, सातारा) असं मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
क्रिकेट खेळणं बेतलं मुलाच्या जीवावर : उन्हाळी सुट्ट्यामुळं पर्यटनस्थळं गजबजली आहेत. साताराजवळच्या कास धरण परिसरातही पर्यटकांची गर्दी वाढत आहे. साताऱ्यातील विश्वकर्मा कुटुंबही पर्यटनासाठी कास परिसरात गेलं होतं. सर्वजण मुलांसमवेत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत होते. क्रिकेट खेळताना बॉल कास तलावाकडं गेला. राकेश चेंडू आणण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात पडला.
पाय घसरून पाण्यात पडल्यानं बुडाला : सध्या कास धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळं धरणानजीकची जमीन निसरडी झाली आहे. चेंडू आणण्यासाठी गेल्यानंतर राकेशचा पाय घसरला. अचानक पाय घसरल्यानं त्याला तोल सावरता आला नाही. तो धरणाच्या पाण्यात पडला. त्या ठिकाणचा डोह चाळीस फूट खोल होता. त्यामुळं राकेश पाण्यात बुडाला. ही बाब लक्षात आल्यानंतर विश्वकर्मा कुटुंबानं आरडाओरड केली. पर्यटक आणि कास वन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देऊन शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला पाचारण केलं.
रेस्क्यू टीमनं गळानं काढला मृतदेह : रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचाव कार्य सुरू झालं. तीन तासांच्या प्रयत्नानंतर गळाच्या साह्यानं राकेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं. कोवळ्या मुलाचा मृतदेह पाहून विश्वकर्मा कुटुंबानं हंबरडा फोडला. आई-वडिलांच्या आक्रोशानं उपस्थितांचं काळीज पिळवटून गेलं. पर्यटनाला गेल्यानंतर पर्यटकांनी काळजी घ्यावी. मुलांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये, असं आवाहन कास वन समिती आणि प्रशासनानं केलं आहे.
हेही वाचा :